उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेने देश हादरला आहे. या घटनेचे पडसाद देशात उमटत आहे. या पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्याचा प्रयत्न राजकीय पक्ष करत आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यांना भेटू दिले नाही. त्यांच्यापाठोपाठ आज तृणमूल नेत्यांच्या शिष्टमंडळालाही उत्तर प्रदेश पोलिसांनी रोखले आहे.
हाथरसमधील सामूहिक बलात्काराच्या घटनेने देश संतापला आहे. उत्तर प्रदेश प्रशासनाने हाथरसमधील पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यापासून रोखण्याची भूमिका घेतल्याने योगी सरकारवर टीका होऊ लागली आहे.
राहुल गांधी यांच्या पाठोपाठ आज तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांच्यासह पक्षाच्या शिष्टमंडळाला उत्तर प्रदेश पोलिसांनी भेट घेण्यापासून रोखले. हाथरसच्या सीमेवरचे पोलिसांनी या शिष्टमंडळाला थांबवले. मात्र, पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यावर तृणमूलचे खासदार ठाम राहिले. यावेळी पोलिसांकडून धक्काबुकी झाल्याचा प्रकार घडला. पोलिसांनी धक्का दिल्याने खासदार डेरेक ओब्रायन जमिनीवर कोसळले.

आम्ही पीडितेच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी निघालो होतो. माञ, आम्हाला परवानगी दिली गेली नाही. आम्ही भेटण्याचा आग्रह धरला. मात्र महिला पोलिसांनी आमच्या खासदार प्रतिमा मोंडले यांचे कपडे फाडले व लाठीचार्ज केला. त्या खाली कोसळल्या. पुरूष पोलिसांनीही त्यांना हात स्पर्श केला. हे लज्जास्पद आहे,असा आरोप तृणमूलच्या नेत्या ममता ठाकून यांनी केला आहे.