पुणे - शिवभक्त आणि अनेक संघटनांनी मागणी केल्यानंतर अखेर 'संभाजी बिडी'चे नाव बदलले आहे. त्यामुळे यापुढे छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने या विडीची विक्री होणार नाही.

पुणे येथील 'साबळे वाघीरे आणि कंपनी' ही कंपनी संभाजी बिडी या नावाने विडी उत्पादन करते. साबळे वाघीरे आणि कंपनीने संभाजी बिडीचे नाव बदलण्याची घोषणा यापूर्वीच केली होती, परंतु नाव बदलण्यास थोडा वेळ लागेल असे कंपनीकडून सांगण्यात आले होते. आता अखेर कंपनीने संभाजी बिडीचे नाव बदलले आहे. अखेर आता छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने विकली जाणारी बिडी आता 'साबळे बिडी' या नावाने विकली जाणार आहे.

1932 पासून साबळे वाघीरे आणि कंपनी विडी उत्पादन क्षेत्रात कार्यरत आहे. 1958 पासून कंपनीने संभाजी विडी नावाने उत्पादन सुरु केले होते. मात्र छत्रपती संभाजी महाराजांचे नाव विडीला देऊ नये अशी मागणी संभाजी ब्रिगेडसह विविध संघटनांनी केली होती. तसेच तीव्र आंदोलने देखील केली होती. मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी ही मागणी घेऊन आंदोलनही करण्यात आले होते. 

“छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी असलेल्या आपल्या सर्वांच्याच भावनांचा आदर ठेवून ‘साबळे वाघिरे आणि कंपनी’ने आपल्या विडीचे पूर्वीचे नाव बदलून ‘साबळे बिडी’ केले. याबद्दल कंपनीचे आभार आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा”, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी टि्वट करून दिली आहे. संभाजी बिडीचे नाव बदलण्याची मागणी करण्यासाठी रोहित पवारांनी गेल्या वर्षी कंपनीच्या व्यवस्थापनाची भेट घेतली होती.

[removed][removed]