कोल्हापूर : राज्यात कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या धोक्यामुळे अंबाबाई मंदिर आणि जोतिबांच्या दर्शनाच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. यापूर्वी दर्शनाची वेळ सकाळी 6 ते रात्री 8 अशी होती. ती आता उद्यापासून (25 फेब्रुवारी) सकाळी ७ ते दुपारी १२ आणि दुपारी ३ ते रात्री ८ अशी करण्यात आली आहे. दुपारी १२ ते ३ या काळात ही दोन्ही मंदिरे पूर्णपणे बंद असेल, असा निर्णय देवस्थान समितीने घेतला आहे. 
देशातील महाराष्ट्रासह सहा राज्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्रातील जवळपास सर्वच जिल्ह्यांत कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसत आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून राज्य सरकारने कोरोना प्रतिबंधात्मक उपाय पाळण्याचे जनतेला आवाहन केले आहे. या पार्श्वभूमिवर कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर आणि जोतिबा मंदिर या देवस्थानातील दर्शनाच्या वेळांमध्ये बदल करण्यात आला आहे. दर्शनासाठी भाविकांनी गर्दी करु नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे, असे देवस्थान समितीने सांगितले आहे. आता नव्या नियमांनुसार अंबाबाई मंदिर आणि जोतिबा मंदिरात भाविकांना सकाळी ७ ते दुपारी १२ आणि दुपारी ३ ते रात्री ८ या वेळेत दर्शन घेता येणार आहे. तर, दुपारी १२ ते ३ या वेळेत ही दोन्ही मंदिरं पूर्णपणे बंद असणार आहेत. हा निर्णय मंदिर देवस्थान समितीने घेतला आहे.

दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांनी नियम पाळणे बंधनकारक :  कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्यामुळे राज्यात सर्वत्र खबरदारी घेतली जात आहे. तसेच, अंबाबाई आणि जोतिबा मंदिरात दर्शनाची वेळ बदलली असली तरी, दर्शनाला येताना भक्तांनी कोरोना नियम पाळणे बंधनकारक करण्यात आले आहे. शासन निर्णयानुसार सर्व भाविकांना मास्क वापरणे बंधनकारक असेल. तसेच, सोशल डिस्टंन्सिगसह सॅनिटायझरचा वापरही देवस्थान समितीने बंधनकारक केले आहे.