(संग्रहित फोटो)

औरंगाबाद - मुंबई आणि ठाणे वगळता २३ नोव्हेंबरपासून राज्यातील बहुतांश जिल्ह्यांतील शाळा सुरु होणार असल्याची माहिती शुक्रवारी (दि.२०) शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. परंतु सरकार आणि प्रशासनाच्या या निर्णयावर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहेत. कारण शाळा सुरु करण्यापूर्वी जिल्ह्यांतील शिक्षकांच्या कोरोना चाचणी केल्यानंतर अनेक शिक्षक कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे आता शाळा सुरु करणे कितपत योग्य राहिल, असा प्रश्न पालकांकडून उपस्थित होत आहे.

उस्मानाबादेत झालेल्या चाचणी ४८ शिक्षक पॉझिटीव्ह आढळले आहेत. तर नांदेडमध्ये एकाच शाळेतील आकरा शिक्षकांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच औरंगाबादेत १५ शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी पॉझिटीव्ह असल्याचे समोर आले आहे. बीड जिल्ह्यात २५ शिक्षक कोरोना पॉझिटीव्ह आढळले आहेत.

कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने औरंगाबादमधील शाळा उघडण्याबाबत आज (दि.२१) निर्णय घेतला जाणार आहे. कोरोनाची स्थिती लक्षात घेऊनच योग्य निर्णय घेतला जाईल, अशी माहिती प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी दिली.

तसेच, नाशिकमधील शाळा पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घ्यावा, की पुढे ढकलावा याबाबत रविवारी तातडीची बैठक आयोजित केली आहे, अशी माहिती नाशिकचे पालकमंत्री तसेच अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

दुसरीकडे, सोलापूर जिल्ह्यात सोमवारपासून शाळा सुरू होणार आहेत. पहिल्या दिवशी 60 हजार विद्यार्थी शाळेला उपस्थित राहतील असा अंदाज प्रशासनाकडून वर्तवला जात आहे.

शिक्षकच कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यामुळे विद्यार्थी, पालकांची चिंता वाढली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता असल्याने शाळा कशा सुरु करायच्या याबाबत प्रशासनामध्ये संभ्रम पाहायला मिळत आहे. दरम्यान, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या शक्यतेने मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील सर्व शाळा 31 डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी घेतला आहे.