मुंबई - एम्स टीमने अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा व्हिसेरा रिपोर्ट सीबीआयकडे सोपवला आहे. मीडिया रिपोर्ट्नुसार, एम्सला व्हिसेरामध्ये कोणत्याही प्रकारचे विष आढळलेले नाही. परंतु सुशांतच्या मृत्यू प्रकरणी कूपर हॉस्पिटलला पूर्णपणे क्लीनचिट देण्यात आलेली नाही.

एम्स टीमने सुशांतचे शवविच्छेदन करणाऱ्या मुंबईच्या कूपर हॉस्पिटलचा रिपोर्ट सविस्तर पाहण्याची गरज आहे, असे सांगितले. कूपर हॉस्पिटल या प्रकरणी अनेक प्रश्नांत अडकले आहे. एम्सच्या रिपोर्टनुसार कूपर हॉस्पिटलने सुशांतच्या मृत्यू प्रकरणी हलगर्जीपणा केला आहे. कूपर हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी सुशांतची ऑटोप्सी केली होती. त्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. सुशांत गळ्याभोवती असलेल्या निशाण्यांचा रिपोर्टमध्ये काहीच उल्लेख करण्यात आला नव्हता. त्याच्या मृत्यूची वेळही रिपोर्टमध्ये नव्हती.

दरम्यान, एम्सने सुशांतचा ऑटोप्सी आणि व्हिसेरा हे दोन्ही रिपोर्ट सीबीआयकडे सोपवले आहेत. या अहवालाच्या आधारावर सीबीआय पुढील तपास करणार आहे.

सुशांत सिंह राजपूतचे मृत्यू प्रकरण सीबीआयसाठी महत्वाचे राहिलेले नाही, असा आरोप सुशांतचे वकील विकास सिंह यांनी केला. परंतु आता एम्सचा अहवाल मिळाल्यानंतर सीबीआय पुन्हा तपास सुरु करणार आहे. सुशांतसिंह राजपूतचा मृत्यू 14 जूनला झाला होता. सुरुवातीला ती आत्महत्या वाटत असली तरी ती हत्या असल्याचा संशय बळावत गेला. सुशांतच्या कुटुंबियांच्या वकिलांनी त्याला मृत्यूपूर्वी विष दिले गेल्याची शंका व्यक्त केली होती. यावर सीबीआयने विविध बाजूंनी तपास सुरु केला.

या प्रकरणी सुशांतची प्रेयसी आणि अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शोविकला अटक करण्यात आलेली आहे.