नवी दिल्ली : मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी पार पडली आहे.आता मराठा आरक्षणाची पुढील सुनावणी १५ मार्च रोजी होईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
मराठा आरक्षणासंदर्भातली सुनावणी सर्वोच्च न्यायालयात मोठ्या खंडपीठासमोर व्हावी, अशी मागणी राज्य सरकारने केली होती. त्यासंदर्भात ८ मार्च अर्थात आजपासून सर्वोच्च न्यायालयात ऑनलाईन व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुनावणी सुरू झाली आहे. यावेळी न्यायालयाने दोन्ही बाजूंची भूमिका ऐकल्यानंतर पुढील सुनावणी १५ मार्च रोजी घेण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे. दरम्यान, हा फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित मुद्दा नसून इतर राज्यांमध्ये देखील ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण गेले आहे.  त्या राज्यांचा देखील यात समावेश करण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्राने केली आहे. ही मागणी सर्वोच्च न्यायालयाने मान्य केली असून या प्रकरणात आता इतर राज्यांना देखील नोटिसा पाठवण्यात येणार आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

मराठा आरक्षण टिकवणे महत्वाचे : मागील वर्षभरात राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात घेतलेल्या भूमिकेवर यावेळी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे. मागील १२ ते १४ महिन्यांत राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात अनेक वेळा चुकीचा निर्णय घेतला आहे. किती वेळा उशिरा निर्णय घेतले या सगळ्या गोष्टींवर मी योग्य वेळी आढावा मांडणार आहे. आत्ता मराठा आरक्षण टिकवणे हे महत्त्वाचे आहे, असे फडणवीस म्हणाले आहे.

विरोधकांनी राजकारण करू नये :  मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधक राजकारण करत आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. मराठा आरक्षणाला राजकीय वळण दिले जाऊ नये. मराठा समाजाला आरक्षणात फायदा मिळावा ही आमची भूमिका आहे. भाजपकडून याला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न सुरू असून ते राज्यासाठी चुकीचे आहे. त्यावरून चुकीचे संकेत जात आहे, असे नाना पटोले म्हणाले आहे.