मुंबई - राज्यात सध्या महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा संघर्ष पाहायला मिळत आहे. दरम्यान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली होती. या टीकेला संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊतांचे नाव घेतले की कानाला त्रास होतो अशी टीका केली होती. याला उत्तर देताना त्यासाठीच उद्धव ठाकरे यांनी आपली नियुक्ती केली असल्याचे संजय राऊत यांनी सांगितलंय.

'मग ही चांगली गोष्ट आहे. कानाला, डोळ्याला, पोटाला तसेच ह्रदयाला त्रास झालाच पाहिजे. म्हणूनच माझी नेमणूक उद्धव ठाकरे यांनी केली आहे', असा टोला राऊतांनी लगावला आहे.

दरम्यान शेतकऱ्यांच्या आंदोलनावरूनही संजय राऊत यांना केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. 'पंजाब, हरियाणातील शेतकरी महाराष्ट्राप्रमाणे आहेत. हा देश सुजलाम सुफलाम व्हावा यासाठी महाराष्ट्र, पंजाब आणि हरियाण या राज्यांनी प्रयत्न केला. जो शेतकरी तुमचा अन्नदाता आहे त्याला तुम्ही दहशतवादी म्हणता. शेतकरी काय दहशतवादी आहेत का? असा सवाल त्यांनी केला आहे.