मुंबई : राज्यातील ठाकरे सरकारच्या वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमिवर भाजप नेते नारायण राणे यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. या टीकेला शिवसेना नेते अनिल परब यांनी सडोतोड प्रत्युत्तर दिले आहे. राज्य सरकारला नारायण राणेंच्या सर्टिफिकेटची गरज नाही. सरकारने वर्षभर काम केले आहे, म्हणून विरोधक नाराज झाले आहे, असा शाब्दिक हल्लाबोल अनिल परब यांनी नारायण राणे यांच्यावर केला आहे.

अनिल परब पुढे म्हणाले की, ठाकरे सरकारने शेतकऱ्यांना सुरुवातीलाच कर्जमाफी दिली आहे. कोरोनात जगाची दैना झाली आहे. ठाकरे सरकार पाच वर्ष टिकणार आहे, असा विश्वास परब यांनी व्यक्त केला. तसेच, विरोधकांना विरोध करण्याशिवाय पाच वर्ष काम नाही, असा टोला परब यांनी विरोधकांना लगावला आहे.

मराठा आरक्षण टिकवण्यासाठी सरकारकडून प्रयत्न : कारशेडसाठी जमिनीबाबत सरकारने अभ्यास करुनच कांजूरमार्गला हलवण्याचा संकल्प केला. मराठा आरक्षण टिकावे यासाठी सरकारकडून प्रयत्न करण्यात येत आहे. चर्चा सुरू आहे. मात्र हा विषय कोर्टात आहे. त्यामुळे कोणत्याही जातीच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देऊ, असे परब यांनी स्पष्ट केले आहे.

हिवाळी अधिवेशनाबाबत सल्लागार समितीची बैठक : परब यांना पञकारांनी पांडुरंग सकपाळ यांच्या अजान स्पर्धेबाबत प्रश्न विचारला. यावर परब म्हणाले, पांडुरंग सकपाळ यांच्या अजान स्पर्धेबाबत अद्याप काहीही माहिती नसल्याचे परब यांनी स्पष्ट केले आहे. तसेच येत्या हिवाळी अधिवेशनाबाबत 4 डिसेंबरला सल्लागार समितीची मीटिंग होईल. त्यावेळी परिस्थितीत आढावा घेऊन निर्णय होईल, असे परब यांनी स्पष्ट केले आहे.