मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकार आणि त्यांच्याकडून तपास यंत्रणांचा गैरवापर होत आहे, अशी टीका केली आहे. तसेच, अनिल देशमुख यांच्यावर आरोप करणारे परमबीर सिंह गायब आहेत. त्यांचा पत्ता अजून लागलेला दिसत नाही, असे देखील शरद पवार यांनी यावेळे स्पष्ट केले आहे.
केंद्र सरकार काही संस्थांचा गैरवापर करण्याची पावले सातत्याने टाकत आहे. त्यात सीबीआय, आयकर विभाग, ईडी, एनसीबी आहे. या सगळ्या एजन्सींचा वापर राजकीय दृष्टीने केला जात आहे, असा आरोप देखील शरद पवार यांनी केला आहे. महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबद्दल तेव्हाच्या मुंबई पोलीस आयुक्तांनी काही आरोप केले होते. त्यांनी हे आरोप मलाही सांगितले होते. पण या आरोपांमुळे निर्माण झालेल्या वातावरणामुळे अनिल देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला. ज्यांनी आरोप केले, ते गृहस्थ आता कुठे आहेत, याचा पत्ता लागलेला दिसत नाही. पण एक जबाबदार अधिकारी जबाबदार मंत्र्यांबाबत बेछूट आरोप करतो, हे चित्र कधी घडले नव्हते. अनिल देशमुखांनी यावर सत्तेपासून बाजूला होण्याची भूमिका घेतली. दुसऱ्या बाजूला ज्यांनी आरोप केले, ते गृहस्थ गायब झाले हा फरक आहे, असे देखील शरद पवार म्हणाले आहे.
अनिल देशमुखांच्या बाबतीत नंतर चौकशी करण्याचे काम सुरू आहे. काल त्यांच्या घरी पाचव्यांदा छापा घातला. मला या एजन्सीचे कौतुक वाटते की त्याच घरात पाच वेळा जाऊन काय त्यांना पुन्हा पुन्हा मिळते माहीत नाही. पण त्यांनी तो विक्रम केला हे मान्य केले पहिजे. पाच वेळा एखाद्याच्या घरी जाणे हे कितपत योग्य आह, याविषयीचा विचार करण्याची वेळ आली आहे. यावर जनमत व्यक्त होण्याची गरज आहे, असे देखील शरद पवार म्हणाले आहे.