सोलापूर : मागील दोन महिन्यांपासून राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली आहे. अनलॉकच्या निर्णयानुसार हळूहळू दुकाने, बाजार, रेस्टॉरंट्स सुरु करण्यात आले. आता मंदिरे आणि शाळा कधी सुरु होणार? असा प्रश्न विचारला जात असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिवाळीपर्यंत शाळा सुरु करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे, आता दिवाळीपर्यंत शाळा आणि महाविद्यालय बंदच राहणार आहे.
उपमुख्यमंत्री पवार पुढे म्हणाले की, अनलॉकच्या निर्णयानुसार आम्ही हळूहळू सर्वकाही सुरु करणार आहोत. परंतु हे करत असताना कोरोनाची परिस्थिती लक्षात घेतली जाईल. शाळा कधी सुरु होणार असा प्रश्न विचारला जातोय. परंतु, शाळा आत्ताच तरी सुरू करणे शक्य नाही. शेजारच्या राज्यांमध्ये शाळा सुरु करण्यात आल्या होत्या, मात्र तिथे विद्यार्थ्याना कोरोनाची बाधा झाल्याचे आढळल्यानंतर प्रशासनाने शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पालक मुलांना शाळेत पाठवायला घाबरत आहेत. आपल्या मुलाला कोरोना झाला तर काय करायचे असा प्रश्न त्यांना पडतो. आम्हालाही मुलांच्या आरोग्याची काळजी आहे. त्यामुळे दिवाळीपर्यंत आम्ही शाळा सुरु करण्याचा निर्णय घेणार नाही. आम्ही दिवाळीनंतर राज्यातील परिस्थितीचा आढावा घेऊ. त्यानंतरच शाळा सुरु करायच्या की नाही, याबाबत निर्णय घेऊ, असे पवार यांनी स्पष्ट केले आहे.