मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामनाला दिलेल्या मुलाखतीत धमकीची भाषा वापरल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. धमकी देणारा मुख्यमंत्री आपण इतिहासात कधीच पाहिला नाही, अशी टीका फडणवीसांनी केली. या टीकेला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

'देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी अनेक धमकीवजा विधाने केली आहेत. त्यात 'सगळ्यांच्या कुंडल्या माझ्या हातात आहेत, ही धमकी नव्हती काय?' ही भाषा तर भयंकर धमकीची होती. त्यांची अशी अनेक वाक्ये आहेत जी धमकी वाटू शकतात. म्हणजे सत्तेचा वापर करुन तुम्ही धमकी देऊ पहात होतात का? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे.

आज महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाले. हा महाराष्ट्रासाठी आनंदाचा दिवस आहे. विरोधी पक्षानेही त्यांच्या पद्धतीने वर्षपूर्ती साजरी केली. त्याचा मी आदर करतो, अशा शब्दात संजय राऊत यांनी भाजपला टोला लगावला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी 'सामना'मधली मुलाखत वाचली आणि पाहिली ही चांगली गोष्ट आहे. मुख्यमंत्र्यांनी धमकीची भाषा नेमकी कुठे वापरली यावर अंडरलाइन केले असते तर मला त्यावर उत्तर देता आले असते. देवेंद्र फडणवीस हे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा 'विरोधकांच्या कुंडल्या हातात घेऊन बसलो आहे', अशी भाषा केली होती. त्यांची अशी अनेक वक्तव्ये माझ्या लक्षात आहेत. जर एखादी केंद्रीय तपास यंत्रणा दडपशाही करुन महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या मागे लागत असेल तर त्यांना उत्तर देणे मुख्यमंत्र्यांचे काम आहे.' असे प्रत्युत्तर राऊतांनी दिले.