मुंबई - राज्यात परतीच्या पावसाने हाहाकार केला आहे. शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून नागरिकांची तारांबळ उडाली आहे. मात्र अद्यापही हा पाऊस थांबण्याचे नाव घेत नाहीये. पुन्हा एकदा हवामान विभागाने परतीचा पाऊस कोसळणार असल्याचे सांगितले आहे. सध्या पावसाने थोडी विश्रांती घेतली असली तरी 21 ऑक्टोबरपर्यंत रिमझिम सुरुच राहणार आहे.

अरबी समुद्र, बंगालच्या खाडीत सातत्याने हवामानात बदल होत आहेत. या बदलाचा परिणाम होत असल्याचे पावसाचा जोर वाढत आहे. विदर्भ, तेलंगणा, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, गुजरात, कोकण, गोवा, मणिपूर, मिझोराम, त्रिपूरा येथे रिमझिम असा पाऊस पडू शकतो.

परतीच्या पावसाची 5 ऑक्टोबरपूर्वी राज्याच्या पूर्वेकडून सुरुवात होते. त्यानंतर 10 ऑक्टोबरपर्यंत राज्यातील बहुतांश भाग, मध्य प्रदेशातील पुर्वेकडील भाग, छत्तीसगडमधील उत्तरेकडील भाग असा परतीच्या पावसाचा प्रवास असतो. परंतु यावर्षी परतीच्या पावसाचा जोर महाराष्ट्रात जास्त दिसत आहे. यंदा हा पाऊस मुंबई आणि महाराष्ट्रात 1 आठवडा लांबण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.