मुंबई : औरंगाबाद महापालिकेची निवडणूक उबंरठ्यावर येवून ठेपल्याने पुन्हा एकदा औरंगाबाद जिल्ह्याच्या नामांतराचा मुद्दा चांगलाच तापला आहे. या नामांतराचा वाद आता महाराष्ट्रभर पसरला आहे. औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा पुढे आला असताना अनेक शहरांची नावे बदलण्याची मागणी आता होऊ लागली आहे. नामांतराच्या या मागण्यांवर सपाचे नेते अबू आझमी यांनी आपली परखड भूमिका मांडत महाराष्ट्राचेच नाव बदलण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केले आहे. त्यामुळे, आता पुन्हा नवा वाद पेटण्याचे चिन्ह निर्माण झाले आहे.
औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याचा मुद्दा भाजपाने उपस्थित केला होता. त्यानंतर अनेक शहरांची नावे बदलण्याची मागणी होऊ लागली आहे. यावरून महाविकास आघाडीतील मित्र पक्षांमध्येच मतभेद असून, भाजपाकडून सातत्यानं या मुद्द्यावर जोर दिला जात असल्याचे दिसत आहे.
शहारांची नावे बदलण्याची मागणी होत असतानाच महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा देणाऱ्या समाजवादी पक्षाने आपली स्पष्ट भूमिका मांडत नामांतराला विरोध केला आहे. सपाचे नेते आमदार अबू आझमी यांनी सोशल मिडीयावर एक व्हिडीओ शेअर करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एका प्रकारे आवाहन केले आहे. “शहरांची नावे बदलून कुणाचे पोट भरत नाही. शहरांना आवडीचे नाव ठेवायचेच असेल, तर नवी शहरे वसवून ठेवा. अहमदनगर किंवा औरंगाबादला एक इतिहास आहे. तो बदलून जबरदस्तीने नामांतर करणे योग्य नाही, असे स्पष्ट मत अबू आझमी यांनी मांडले आहे. तसेच, नामांतर करायचेच असेल, तर आधी महाराष्ट्राचे नाव बदलून राज्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव द्या. रायगडाचे नाव बदलून संभाजी महाराजांचे नाव द्या. लोकांनाही ते आवडेल. माञ, केवळ काही लोकांना डिवचण्यासाठी नामांतर करणे हे आपल्याला शोभत नाही,” असे अबू आझमी म्हणाले आहे.

थेट इशारा, म्हणाले हिंदू-मुस्लिम तेढ निर्माण करू नका : “महाराष्ट्रात जगभरातून, देशातून लोक येत असतात. तुम्ही राज्याला पुढे घेऊन जा. विकास करा. नवे जिल्हे निर्माण करा. लोक नक्कीच तुमचे कौतुक करतील. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांप्रमाणे हिंदू-मुस्लिम तेढ निर्माण करण्याचे काम करू नका. ते आपल्यासारख्याला शोभत नाही, असे आझमी म्हणाले आहे.