पैठण - मागील आठवड्यापासून परतीच्या पावसाने मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये तांडव केला आहे. शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले, पिके पाण्याखाली गेली आहेत. शेतकऱ्यावर इतके मोठे संकट ओढावलेले असतानाही केंद्र किंवा राज्य सरकारकडून कोणतीही मदत मिळालेली नाही.

आता पाऊस ओसरण्याच्या मार्गावर असताना आता राज्यातील काही नेत्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जावून पाहणी करण्यास सुरुवात केली आहे. परंतु मुख्यमंत्र्यांनी अद्याप घरच सोडले नसल्याचे भाजप त्यांच्यावर वारंवार टीका करत आहे.

दरम्यान, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. दानवे म्हणाले, 'आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगितले, घराबाहेर पडा, तर म्हणतात, माझे कुटुंब माझी जबाबदारी. आम्ही राज्यभर फिरत आहोत, आम्हाला काही होत नाहीये. यांना एकट्यालाच घरात बसून कोरोना खातोय की काय.'

'या स्थितीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यभर फिरत आहेत. मागच्या वर्षीदेखील ते शेतकऱ्यांच्या बांधावर गेले होते. राजा घराच्या बाहेर आला पाहिजे, लोकांमध्ये गेला पाहिजे. ही आपली माझे कुटुंब, माझी जबाबदारी आहे.' असाही टोला दानवेंनी लगावला.

आमच्या सरकारने शेतकऱ्यांना अनेक योजना दिल्या, परंतु या राज्य सरकारने काय दिले? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. हे सरकार नेमके कोण चालवतंय काहीच कळेना. कोण निर्णय घेतंय, काहीच कळत नाही. तिघांची तोंड तीन दिशेला असलेले हे सरकार आहे. यांच्या काळात या राज्याची अवस्था होणार आहे, कुणास ठावूक, असेही ते म्हणाले.