पुणे - बेपत्ता झालेल्या प्रसिद्ध उद्योजकाची सुसाईड नोट सापडल्याने पुण्यात मोठी खळबळ उडाली आहे. ऑटोमोबाईल क्षेत्रातील प्रसिद्ध उद्योजक म्हणून ओळखले जाणारे गौतम पाषाणकर बुधवारी (दि.२१) सायंकाळी साडे चार वाजेपासून बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली होती. या प्रकरणी नातेवाईकांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली.

पोलीस तपास सुरु असताना गौतम पाषाणकर यांची सुसाईड नोट सापडली आहे. या सुसाईड नोटमध्ये व्यवयातील आर्थिक नुकसानामुळे आत्महत्या करत असल्याचे गौतम यांनी लिहिले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'गौतम यांनी बुधवारी दुपारी लोणी काळभोर येथे भेट दिली होती. त्यानंतर ४ वाजता जंगली महाराज रोडवरील कार्यालयात गेले होते. त्यांच्या कार चालकाने अनेकदा फोन केला, परंतु त्यांना फोन लागत नव्हता. त्यानंतर कार चालकाने गौतम यांचा मुलगा कपिलला फोन करुन सांगितले.'

गौतम यांनी त्यांच्या कार चालकाकडे एका लिफाफा दिला होता. घरी गेल्यानंतर गौतम यांच्या पत्नीने उघडून बघितल्यानंतर त्यात सुसाईड नोट निघाली. व्यवसायात मोठे नुकसान झाल्याचा उल्लेख या नोटमध्ये केला आहे.