पुणे - कोर्टात मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने हा मुद्दा चांगलाच पेटला आहे. मराठा आरक्षणामुळे राजकिय वातावरणही तापले आहे. या दरम्यान मराठा समाजाच्या मोर्चाला वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिला आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पुण्यात याबाबत घोषणा केली. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यावर जहरी टीका केली.

'एक राजा बिनडोक आहे तर दुसऱ्याच आरक्षणापेक्षा इतर गोष्टींवर जास्त भर आहे. राज्यसभेत कसे पाठवले, याचे आश्चर्य वाटते.' अशा शब्दांत त्यांनी दोन्ही राजेंवर टीका केली. तसेच प्रकाश आंबेडकर म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण नाही तर सर्वांचेच आरक्षण रद्द करा, अशी बिनडोक भूमिका त्यांनी मांडली'

आबेंडकर पुढे म्हणाले की, 'मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण या पूर्णपणे वेगळ्या गोष्टी असल्याचे स्पष्टकेले. कोणत्याही परिस्थितीत ओबीसीमध्ये मराठा समाजाला आरक्षणाची मागणी केली जाणार नाही, याची दक्षता घेतली जावी. सुरेश पाटील यांनी मला १० तारखेच्या मोर्चाला वंचितने पाठिंबा द्यावा, अशी विनंती केली होती. मी त्यांना कोणत्याही परिस्थितीत ओबीसींच्या आरक्षणात मागणी करू नका, अशी विनंती केली. या प्रश्नावरून मराठा संघटनांमध्येही वेगवेगळे गट निर्माण होण्याची शक्यता आहे. यापैकी काहीजण भविष्यात आक्रमक भूमिका घेऊ शकतात. परिणामी राज्यातील सामंजस्य बिघडण्याची शक्यता आहे. ही परिस्थिती टाळण्यासाठी आपण येत्या १० तारखेला आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला पाठिंबा देणार असल्याचे आंबेडकर यांनी सांगितले.'