पुणे : भारतात पर्यटनासाठी आलेल्या नायजेरिया आणि युगांडा मधील १६ महिलांना पिंपरी चिंचवड पोलिसांनी सेक्स रॅकेट चालवल्या प्रकरणी ताब्यात घेतले आहे. यापैकी चौघांना अटक करण्यात आली असून १२ जणांची सुटका केली आहे. ४ महिला आरोपींना बुधवारी जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. पुढील तपासासाठी त्यांना ६ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. नायजेरिया आणि युगांडामधील या महिला प्रवास आणि व्यवसायाच्या बहाण्याने पुण्यात आल्या आणि सेक्स रॅकेटमध्ये सामील झाल्याचे तपासात समोर आले आहे. 

पोलिसांनी रचला होता असा सापळा : पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून आरोपींना ताब्यात घेतले आहे. पोलिस सहायक निरीक्षक निलेश वाघमारे यांनी सांगितले की, या महिला सांगवीच्या पिंपळ गुरव भागात वक्रतुंड अंगण नावाच्या एका अपार्टमेंटमधील अनेक फ्लॅट्समध्ये राहत होत्या. आम्ही चार बनावट ग्राहकांना घटनास्थळी पाठवले आणि पुष्टी झाल्यानंतर रात्री उशिरा छापा मारला. सुटका केलेल्या महिलांना हडपसर येथील बचाव फाउंडेशन येथे ठेवण्यात आले आहे. या महिलांकडून ४०  हजार रुपये, ७ मोबाइल फोन आणि काही दागिने जप्त केले आहे, असे वाघमारे यांनी सांगितले आहे.

एका गुप्त सूचनेनंतर केली  कारवाई : एक गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिस आयुक्त कृष्णा प्रकाश यांच्या आदेशावरून सहायक पोलिस आयुक्त प्रेरणा कट्टा आणि सामाजिक सुरक्षा कक्षाचे वरिष्ठ निरीक्षक विठ्ठल कुबडे यांच्या पथकाने बुधवारी या रॅकेटचा भंडाफोड केला आहे.