पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (दि.२८) पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला भेट देणार आहेत. मात्र पंतप्रधानांच्या या दौऱ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी उपस्थित राहणार नाहीत, अशी माहिती आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अगदी कमी वेळेत हा दौरा आटोपणार असून लगेच परतणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री किंवा राज्यपाल यांनी उपस्थित राहण्याची आवश्यकता नाही, असे पंतप्रधान कार्यालयाकडूनच कळविण्यात आले आहे. या सुचनेमुळे मुख्यमंत्री हे पंतप्रधानांचे आगमन आणि दौऱ्यात उपस्थित राहणार नाहीत. प्रोटोकॉलनुसार पंतप्रधान राज्यात आल्यानंतर मुख्यमंत्री त्यांच्या स्वागताला उपस्थित राहतात.

पीएमओने केलेल्या टि्वटमध्ये म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी लस निर्मिती प्रक्रिया आणि त्यासंदर्भातील कामाबाबत पाहणी करणार आहेत. ते यासाठी ३ शहरांच्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान अहमदाबादमधील झायडस कॅडिला पार्क, हैदराबादमधील भारत बायोटेक आणि पुण्यातील सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडिया मध्ये भेट देतील.

मिळालेल्या माहितीनुसार पंतप्रधान मोदी यांनी सकाळी ९.३० वाजता अहमदाबादमधील झायडस कॅडिला पार्कला भेट दिली. त्यानंतर ते दुपारी १.३० पर्यंत भारत बायोटेक, हैदराबादला भेट देत आहेत. त्यानंतर ते पुण्याला रवाना होतील आणि सिरम इन्स्टिट्यूटला ४.३० वाजता भेट देतील.