मुंबई : लालबाग परिसरामधील वन अविघ्न पार्क या आलिशान इमारतीला आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास भीषण आग लागल्याची माहिती समोर येते आहे. ही आग विझवण्यासाठी अग्निशामन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहे. ही आग लेव्हल तीनची असल्याचे सांगण्यात आले आहे.
वन अविघ्न पार्क ही इमारत भारत माता थेअटर समोर आहे. लालबागमधील सर्वात उंच इमारतींपैकी एक असणारी ही इमारत ६० मजल्यांची आहे. यातील १९ व्या मजल्यावर ही आग लागली आहे. आग लागल्यानंतर काहींनी खाली उड्या मारल्याची समोर आले आहे. एक व्यक्ती गॅलरीला लटकून जीव वाचवण्याचा प्रयत्न करत असतानाच खाली पडल्याचे देखील दिसून आले आहे.
पडलेली व्यक्ती सुरक्षारक्षक असल्याची माहिती पुढे आली आहे. स्थानिक आमदार अजय चौधरींनी ही प्राथमिक माहिती दिली आहे. पाचव्या माळ्यावर आग लागल्यानंतर ती पसरली आणि १९ व्या माळ्यापर्यंत पोहोचल्याचे सांगितले जाते आहे.
या भागामधील गल्ल्या आणि रस्ते अरुंद असून अग्निशामन दलाच्या गाड्यांना घटनास्थळी पोहचायला वेळ लागू शकतो, असे सांगण्यात येत आहे. तसेच आग १९ व्या मजल्यावर असल्याने तिथपर्यंत पोहचण्यास आखणीन वेळ लागण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.