मुंबई - सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा अहवाल सीबीआयने सादर केल्यानंतर हे प्रकरण आता थंड पडले आहे. मागील तीन महिन्यांपासून यावरुन राजकिय वातावरण तापले होते. एम्स हॉस्पिटलने सुशांतने आत्महत्या केल्याचे नमूद केल्यानंतर या वादावर पडदा पडला आहे. परंतु महाविकास आघाडी सरकारवर आणि मुंबई पोलिसांची बदनामी करणाऱ्यांना शिवसेनेने चांगलेच धारेवर धरले आहे.

यावरुन भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेनेला लक्ष्य केले आहे. अजून सीबीआयचा रिपोर्ट बाकी असल्याने एवढ्या लवकरच डीजे वाजवू नका, असा टोला लगावला आहे. एम्स हॉस्पिटलचे डॉक्टर सुधीर गुप्ता यांनी अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्याच केली आहे, असे शिक्कामोर्तब केल्यानंतर शिवसेनेने मुंबई पोलीस आणि शिवसेनेच्या कामगिरीवर प्रश्न उभे करणाऱ्या भाजपवर टीका करण्यास सुरुवात केली आहे.

या पार्श्वभूमीवर निलेश राणे यांनी एक टि्वट करुन शिवसेनेला टोला लगावला आहे. 'सुशांत सिंह राजपूत केसच्या एम्स अहवालानंतर शिवसेना उड्या मारायला लागली, त्यांना वाटतं की केसचा निकाल लागला. बॉडी नसल्यामुळे फक्त उरल्यासुरल्या गोष्टींवर अहवाल द्यावा लागला. सीबीआयचा रिपोर्ट अजून बाकी आहे. अजून खूप काय बाकी आहे एवढ्या लवकर डीजे वाजवू नका' अशी बोचरी टीका निलेश राणे यांनी टि्वटरवरुन शिवसेनेवर केली आहे.