शिर्डी : देशासह महाराष्ट्रात कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिर्डीमधील साई संस्थानने साई भक्तांना दर्शनासाठी पुन्हा एकदा नियम बदलले आहे. आता सकाळी ६ ते रात्री ९ या वेळेतच साई भक्तांना दर्शन घेता येणार आहे. रात्री ९ ते सकाळी ६ अशा ९ तासांसाठी दर्शन बंद ठेवण्यात आला आहे, असा निर्णय साई संस्थानने घेतला आहे. अहमदनगर जिल्हाधिकाऱ्यांनी नाईट कर्फ्यूची घोषणा केली आहे. शिर्डी देवस्थानने हा निर्णय घेतल्याचे देवस्थानकडून स्पष्ट करण्यात आला आहे.
 दिल्लीत कोरोनाची दुसरी लाट आली आहे.  या पार्श्वभूमीवर देशाच्या इतर भागात देखील बाधितांचा आकडा वर जाऊ लागला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर इतर देशांमध्ये सापडलेला कोरोनाचा नवा स्ट्रेनदेखील भारतात काही राज्यांमध्ये सापडला आहे. हे बाधित लागलीच शोधून त्यांना क्वारंटाईन केले असले, तरी देशातले इतर करोनाबाधित वाढू लागले आहेत. महाराष्ट्रात देखील हेच चित्र असल्यामुळे काही जिल्ह्यांमध्ये पुन्हा निर्बंध लागू करण्यात आले असून अहमदनगरमधील नाईट कर्फ्यू हा त्याचाच एक भाग आहे.
यावेळी शिर्डी संस्थानने दर्शनाच्या वेळेसोबत इतरही काही निर्बंध भाविकांसाठी नव्याने घातले आहे. त्यामध्ये सकाळची काकड आरती आणि रात्रीची शेज आरती भक्तांसाठी बंद असेल, गुरुवारची पालखी देखील बंद असेल, गुरुवार-शनिवार-रविवार आणि उत्सवाच्या दिवशी बायोमेट्रिक पास काऊंटर बंद ठेवण्यात येईल, अशा काही नियमांचा समावेश आहे.