मुंबई: बिहार विधानसभा निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसने उडी घेतली आहे. राष्ट्रवादी बिहार विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार आहे, अशी माहिती खासदार प्रफुल्ल पटेल यांनी दिली. निवडणूक लढण्यासाठी आमच्याकडे मोठ्या प्रमाणावर उमेदवार उपलब्ध आहे, असे पटेल यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादी काँग्रेसला बिहार निवडणुक युपीएच्या महाआघाडीमध्ये लढण्याची इच्छा होती. मात्र, राष्ट्रवादीला समाधानकारक जागा मिळत नसल्यामुळे स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा पटेल यांनी केली आहे. बिहारमध्ये पक्षाची ताकद मोठ्या प्रमाणात आहे. आमच्याकडे उमेदवार देखील मोठ्या प्रमाणात इच्छुक आहेत. यासंदर्भात लवकरच बैठक घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसची पुढील दिशा ठरवण्यात येईल, असे पटेल यांनी सांगितले.

शिवसेना 50 जागांवर लढणार :
शिवसेनेने बिहार निवडणुकीत 50 जागांवर लढणार आहे. पक्षाकडून 20 स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, सुभाष देसाई, चंद्रकांत खैरे यांच्यासह इतर नेत्यांचा समावेश आहे. दरम्यान, जदयूने तक्रार केल्यामुळे शिवसेनेला धनुष्य बाण या चिन्हावर निवडणूक लढता येणार नाही.