जळगाव - मागील अनेक दिवसांपासून पक्षावर नाराज असलेले एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगत आहे. आता या चर्चेला नवीन टि्वस्ट मिळाला आहे. एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली.

जळगाव जिल्ह्यातील रावेर हत्याकांड प्रकरणी अनिल देशमुख रावेरमध्ये आले आहेत. रावेर येथील विश्रामगृहात अनिल देशमुख आणि एकनाथ खडसे यांची भेट झाली. परंतु या भेटीत काय चर्चा झाली याबाबत गुप्तता पाळली आहे. या ठिकाणहून एकनाथ खडसे आणि अनिल देशमुख हे एकाच गाडीने घटनास्थळी गेले.

शुक्रवारी जवळगाव जिल्ह्यातील बोरखेडा शिवारातील चार अल्पवयीन मुलांची हत्या केल्याची घटना घडली. या मुलांवर रावेर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या रावेर हत्याकांडात आतापर्यंत तीन जणांना अटक केली आहे. या पीडित कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी अनिल देशमुख आणि एकनाथ खडसे एकत्र गेले होते.

योग्य वेळी उत्तर देईल...
एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची जोरदार चर्चा असताना त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली. खडसे म्हणाले, 'राष्ट्रवादी प्रवेशाबाबतचे सारे मुहूर्त तुमचेच आहेत, म्हणजे माध्यमांनी ठरवले आहेत. यावर मला काहीच बोलायचे नाही. योग्य वेळ येईल तेव्हा उत्तर देईल...नो कमेंट्स.' असे उत्तर देत खंडन केले.

घटस्थापनेच्या मुहूर्तावर एकनाथ खडसे राष्ट्रवादीत जाणार असल्याचे बोलले जात होते. परंतु त्यांचा संभाव्य राष्ट्रवादी प्रवेश लांबणीवर गेला आहे.