मुंबई: सुशांतसिंह राजपूतची हत्या नसल्याचे 'एम्स'च्या अहवाल स्पष्ट झाल्यानंतर मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे. आयुक्त परमबीर सिंह म्हणाले, सुशांत प्रकरणात मुंबई पोलिसांचा तपास योग्यच होता हे सिद्ध झाल्याचे, परमबीर सिंह यांनी म्हटले आहे.

सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर देशभरात संताप व्यक्त होत होता. सुशांतची आत्महत्या नसून खून आहे. मुंबई पोलीस योग्य पद्धतीने तपास करत नसल्याचा आरोप भाजपसह बॉलिवूडमधील काही मंडळींनी केला होता. अखेर हे प्रकरण सीबीआयकडे गेले होते. सुशांतचा मृत्यू हा खून आहे की आत्महत्या याचा तपास करण्यासाठी सीबीआयने एम्सची समिती स्थापन केली होती. या समितीनं अहवाल दिला असून सुशांतने आत्महत्याच केल्याचे 'एम्स'ने स्पष्ट केले आहे.'एम्स'च्या अहवालानंतर परमबीर सिंह यांनी पीटीआयशी बोलताना वरील प्रतिक्रिया दिली आहे.

तपासाविषयी कुठलीही माहिती नसताना काही लोकांनी स्वत:चे हितसंबंध जपण्यासाठी मुंबई पोलिसांना लक्ष्य केले होते. खरेतर, मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा तपास अत्यंत प्रोफेशनल पद्धतीने केला होता. कूपर हॉस्पिटलच्या डॉक्टरांनीही सुशांतचं पोस्टमॉर्टेम व्यवस्थित केले होते. 'एम्स'च्या अहवालामुळे आम्हाला सगळ्यांनाच न्याय मिळाला,' असे परमबीर सिंह म्हणाले.

'मुंबई पोलिसांनी आपला चौकशी अहवाल सीलबंद लिफाफ्यात न्यायालयात सादर केला होता. त्याबद्दल केवळ सहा जणांना माहिती होती. त्यात तपास अधिकारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस उपायुक्त, पोलीस आयुक्त, राज्याचे महाधिवक्ता व न्यायाधीश यांचा समावेश होता. इतर कुणीही हा अहवाल पाहिला नव्हता किंवा कोणाला अहवालात काय आहे याची अजिबात माहिती नव्हती. असे असतानाही काही लोकांनी विनाकारण मुंबई पोलिसांच्या तपासावर टीका केली,' असे परमबीर सिंह म्हणाले.