पुणे - आधी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना ईडीची नोटीस आली. त्यानंतर राज्यातील चित्रे पालटले. ईडीचा पायगुण चांगला आहे, येऊ द्या नोटीसा, असा उपरोधिक टोला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपला लगावला.

पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी सुप्रिया सुळे या मावळमध्ये आल्या होत्या. यावेळी त्यांनी ईडीच्या चौकशीवरून भाजपवर निशाणा साधला. शरद पवारा यांना ईडीने याआधी नोटीस पाठवली होती. त्यानंतर राज्यात सत्तांतर झाले. आता शिवसेनेला ईडीची नोटीस आली आहे. आधीच त्यांना मुख्यमंत्रीपद मिळाल आहे. आता शिवसेनेला आणखी काही मोठे मिळणार आहे असे दिसतेय. ईडीचा पायगुण चांगला आहे, येऊ द्या नोटीसा. सगळे चांगले घडेल, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

आज राज्यातील महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झालेय. आमचे सरकार आल्यावर अनेक दावे, भविष्यवाण्या वर्तवल्या गेल्या. हे सरकार सात दिवस टिकेल, त्यानंतर सात महिने टिकेल, असे सुरुवातीला म्हटले गेले. आता तर एक वर्ष झालेय, आता पुढची पाच वर्षेच काय २५ वर्षेही कधी उलटून जातील, हे कळणारही नाही, असे त्या म्हणाल्या.

बाहेरून आलेल्यांनी लसीवर क्लेम करू नये...
पुणेकरांनी बनविलेल्या कोरोनावरील लसीवर बाहेरून आलेल्यांनी क्लेम करू नये. तुमच्या इथे 1400 कोटी, 1500 कोटींच्या गप्पा चालतात. आमच्या दिल्लीत तर एक लाख कोटींच्या गप्पा असतात. या गप्पा कोण मारते तुम्हाला चांगले माहीत आहे. आज आहेत 'ते' आपल्या पुण्यात. बघा 'दुनिया घुम लो, हमारे पुणे के आगे कुछ नहीं'. जग फिरल्यावर शेवटी आमच्या पुण्यातच लस सापडणार आहे. ही लस पुणेकरांनी शोधलीये, नाही तर कोणीतरी म्हणायचे मीच शोधली, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता सुप्रिया सुळे यांनी टीका केली.