मुंबई - सविनय कायदेभंग आंदोलन प्रकरणी मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यासह चौघांवर कल्याण रेल्वे पोलिसांकडून 107 अंतर्गत कारवाई करण्यात आली. याप्रकरणी कल्याण रेल्वे एसीपी कार्यालयात आज सुनावणी झाली. संदीप देशपांडे यांच्यासह मनसे नेते गजानन काळे, अतुल भगत, संतोष धुरी एसीपी कार्यालयात हजर झाले.

यावेळी संदीप देशपांडे यांनी मध्यमांसमोर आक्रमक प्रतिक्रिया दिली. संदीप देशपांडे म्हणाले, 'आम्ही सविनय कायदेभंग आंदोलन लोकहितासाठी केले. कायद्याची प्रोसिजर आता पार पाडत आहोत. परंतु हे लक्षात ठेवावे ज्यावेळी राज साहेबांचे सरकार येईल तेव्हा सर्व हिशोब व्याजासकट चुकता होईल. आता जो त्रास देताय तो लक्षात ठेवतोय.'

'सरकारने कानात कापसाचे बोळे घातले आहेत, का? पण हायकोर्टाने कान टोचले आहेत. त्यामुळे सरकारने आतातरी सुधारले पाहिजे. आज तिच गोष्ट हायकोर्ट म्हणाले आहे. सरकार घरी बसू काम करत आहे. सरकारने सर्वसामान्यांची जबाबदारी घेऊन रेल्वे सुरु केली पाहिजे.' अशी मागणीही संदीप देशपांडे यांनी केली.

मुंबई लोकल लवकरात लवकर सुरु करण्यासाठी 21 सप्टेंबर रोजी लोकल प्रवास करत सविनय कायदेभंग आंदोलन करण्यात आले होते. या अंदोलनात मनसेचे संदीप देशपांडे, संतोष धुरी, गजानन काळे, अतुल भगत सामील झाले होते. पोलिसांनी आंदोलन करु नका असे सांगून मनसे कार्यकर्त्यांना नोटीस पाठवली होती. तरीही नोटीसचे उल्लंघन करून संदीप देशपांडे यांनी कार्यकर्त्यांसह रेल्वेने प्रवास केला होता.