मुंबई - कोरोनामुळे विस्कळीत झालेले राज्यातील जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी लॉकडाउन शिथिल करण्याच्या दिशेने राज्य सरकारने मोठं पाऊल टाकले आहे. त्यादृष्टीने 'मिशन बिगिन अगेन' अंतर्गत येत्‍या ५ ऑक्‍टोबरपासून राज्‍यातील हॉटेल्‍स, रेस्‍टॉरंट आणि बार तसेच फूडकोर्ट  सुरू करण्यास राज्‍य सरकारने परवानगी दिली आहे. मात्र, एकूण क्षमतेच्या ५० टक्के ग्राहकांनाच प्रवेश देण्याचं बंधन सरकारन घातले आहे. त्याचबरोबर राज्यातील प्रवासी वाहतूक पूर्वपदावर आणण्यासाठी राज्यांतर्गत रेल्वे सुरू करण्याचा निर्णयही सरकारने घेतला आहे.  मुंबईतील लोकल गाड्यांच्या फे-या वाढणार असून मुंबईच्या डबेवाल्‍यांनाही लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा प्रार्दुभाव वाढत असल्याने राज्य सरकारने काही निर्बंध कायम ठेवले होते. त्यामुळे राज्याचा गाडा विस्कळीत झाला असून, आर्थिक ताण वाढत चालला आहे. लॉकडाउन आणि त्‍यानंतर मिशन बिगिन अगेन सुरू झाले तरी राज्‍यातील रेस्‍टॉरंट व बार सुरू झाले नव्हते. गेल्या काही दिवसांपासून रेस्टॉरंट सुरू करण्याची मागणी होत होती. हॉटेलचालक संघटनांच्या प्रतिनिधींनी नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेउन राज्‍यातील हॉटेल, रेस्‍टॉरंट तातडीने सुरू करण्यात यावीत अशी मागणी केली होती. राज्‍य सरकारने या मागणीला हिरवा कंदिल दाखविला असून येत्‍या ५ ऑक्‍टोबर पासून राज्‍यातील हॉटेल, रेस्‍टॉरंट, बार आणि फूडकोर्ट त्‍यांच्या ५० टक्‍के क्षमतेने सुरू होणार आहेत. म्‍हणजेच जर १०० ग्राहक बसण्याची हॉटेलची क्षमता असेल तर तिथे ५० ग्राहकच बसू शकणार आहेत. सोशल डिस्‍टन्सिंगचे सर्व नियम अर्थातच पाळावे लागणार आहेत. यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. 

मुंबई महानगर प्रदेशातील सर्व इंडस्‍ट्रीयल आणि मॅन्युफॅक्‍चरिंग युनिटही सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.रूग्‍णांना लागणारी ऑक्‍सीजनची आवश्यकता पाहता सर्व ऑक्‍सीजन पुरवठा करणा-या वाहनांना कोणत्‍याही आडकाठी शिवाय चोवीस तास वाहतुकीची परवानगी देण्यात आली आहे. ऑक्‍सीजन निर्माते व पुरवठादार यांच्यावरही कोणतेही निर्बंध टाकण्यात येणार नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.

शाळा, कॉलेज मात्र बंदच

राज्‍यातील शाळा,कॉलेज मात्र बंदच राहणार आहेत.सिनेमागृह,स्‍विमिंग पूल,थिएटर देखील बंदच राहणार आहेत.मेट्रो रेल्‍वे देखील बंदच राहणार आहे.

राज्‍यांतर्गत रेल्‍वेगाड्यांना परवानगी

राज्‍यांतर्गत ज्‍यांचा प्रवास होतो अशा लांब पल्‍ल्याच्या रेल्‍वेगाड्यांनाही परवानगी देण्यात आली आहे. मुंबईतील लोकलमधून अत्‍यावश्यक सेवा देणा-या कर्मचा-यांना प्रवासाची परवानगी आधीच देण्यात आली आहे. मात्र लोकलमधील वाढती गर्दी पाहता लोकलच्या फे-या वाढविण्यास सांगण्यात आले आहे. मुंबईतील लोकलमधून मुंबईच्या डबेवाल्‍यांनाही प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. त्‍यासाठी पोलिसांकडून त्‍यांना क्‍यूआर कोड घ्‍यावा लागणार आहे.मुंबईतील लोकलसेवांच्या धर्तीवरच पुणे विभागातील लोकल देखील सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.