वसई - आज (दि.२१) वसईच्या एव्हरशाईन परिसरातील सेक्टर नं 4 मधील उच्चभ्रू सोसायटीत पती आणि पत्नीचा मृतदेह सापडल्याने एकाच खळबळ उडाली आहे. पतीपत्नीचा संशयास्पद मृत्यू होण्याची ही एकाच आठवड्यातील दुसरी घटना आहे.

पत्नीचा मृतदेह बेडवर मिळाला आहे तर पतीचा मृतदेह घराच्या छतावरील हुकवर दोरीच्या साहाय्याने लटकलेल्या स्थितीत मिळाला. तुळिंज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. परंतु पत्नी-पत्नीच्या मृत्यूचे कारण मात्र अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिस याचा तपास करत आहेत.

राहुल धना चव्हाण (वय 28) आणि त्याची पत्नी ज्योती राहुल चव्हाण (वय 23) असे या मयत दाम्पत्याचे नावे आहेत. झालेला प्रकार नेमका हत्या की आत्महत्या हे आणखी समोर आले नाही. पत्नीचा मृतदेह बेडवर पडला असल्याने तिची हत्या करुन, पतीने आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

वसई पूर्व एव्हरशाईन सिटी सेक्टर नं 4, मधील एक्युरिअस या सोसायटीत हे दाम्पत्य राहत होते. शुक्रवारी रात्री घरात उशीरापर्यंत लाइट बंद असल्याचे आढळून आल्यावर इमारती मध्येच राहणाऱ्या त्यांच्या नातेवाइकांनी पोलिसांना बोलावून रुमचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. हॉलमध्ये दोरीच्या साहाय्याने घराच्या छताला लटकलेल्या अवस्थेत राहुलचा मृतदेह मिळाला तर बेडरुममध्ये ज्योतीचा मृतदेह मिळाला.

राहूल हा मेट्रोमध्ये गार्डची नोकरी करायचा. त्याला १८ हजार रुपये पगार होता. परंतु या एवढ्या पगारात त्यांचा घरखर्च भागत नसल्याने पती-पत्नीमध्ये पैशांवरून वाद होत असल्याचे सुत्रांनी सांगितले. त्यांचे दीड वर्षांपूर्वीच लग्न झाले होते.

तुळिंज पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला तसेच मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत. शवविच्छेदन अहवालानंतर दोघांच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकेल असं पोलिसांनी सांगितले आहे.

गुरुवारी वसईच्या भोयदापाडा परिसरात जेवणात विषारी औषध घेऊन, पती पत्नीने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. तर या घटनेला दोन दिवस होत असतानाच ही घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.