सातारा- मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टात स्थगिती मिळाल्यानंतर मराठा समाज विविध मार्गाने राज्यभर आंदोलन करत आहे. जोपर्यंत मराठा आरक्षणावरील स्थगिती उठत नाही तोपर्यंत फायदा मिळाला पाहिजे, अशी मागणी मराठा आरक्षण संघर्ष समितीचे सुरेश पाटील यांनी केली आहे. आता EWSच्या मुद्दयावरून मराठा समाजात मतभेद निर्माण झाल्याने दिसत आहेत. येत्या 10 ऑक्टोबरपर्यंत मराठा समाजाच्या 3 मागण्या मान्य झाल्या नाही तर महाराष्ट्र बंदचा इशाराही सुरेश पाटील यांनी दिला आहे.

याबाबत सुरेश पाटील म्हणाले, 'संभाजी महाराज हे राजे आहेत. ते शाहू महाराजांचे वंशज आहेत. मुख्यमंत्र्यांना भेटायला जाण्यापूर्वी सर्व संघटनांची बैठक घेऊन त्यांची मतं घ्यायला हवी होती. काही संघटनांचे ऐकून त्यांनी ही चुकीची भूमिका घेतली. उदयनराजे असावेत किंवा संभाजीराजे ते मराठा आरक्षणाच्या मुद्दयावर लक्ष देतात तिथपर्यंत ठिक आहे, परंतु नेतृत्व करु नये, असे वाटते.जर मराठा समाजाचे नेतृत्व त्यांच्याकडे गेले तर त्यांना धनगर समाज, ओबीसी, भटकेविमुक्त, इतर समाज त्यांचेही नेतृत्व करावे लागेल.'

'संभाजीराजे यांनी EWS मागणीबाबत घेतलेली भूमिका चुकिची आहे. मराठा समाजाला आर्थिक दुर्बल घटकातून आरक्षण महत्वाचे आहे. जर सरकारने येत्या 10 ऑक्टोबरपर्यंत मराठा समाजाच्या 3 मागण्या मान्य केल्या नाही तर महाराष्ट्र बंद करु' असेही सुरेश पाटील पुढे म्हणाले.

तीन मागण्या...
- केंद्रातील 10 टक्के आरक्षण देऊन ते लागू करा.
- सध्याच्या नोकर भरतीला स्थगिती
- काही दिवसांपूर्वी 1200 आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यात यावे.

मराठा समाज-मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत झालेली चर्चा...
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर खासदार संभाजीराजे, नरेंद्र पाटील यांच्यासह सकल मराठा समाजाच्या नेत्यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याने राज्या सरकारने मराठा समाजाला तात्पुरत्या स्वरुपात EWS च्या सवलती आणि आरक्षणाचा लाभ देण्याचा निर्णय घेतला होता. परंतु मराठा समाजाला आर्थिक दुर्बल घटकातून (EWS) आरक्षण नको, असे त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. EWS मध्ये मराठा समाजाला तात्पुरते आरक्षण नको असे सांगून त्याचे तोटे सांगितल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला EWS मध्ये न टाकण्याचे तत्काळ आदेश दिले, असे संभाजीराजेंनी सांगितले.