नाशिक - मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा क्रांती मोर्चाने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. मराठा विद्यार्थ्यांचे प्रश्न २ डिसेंबरपर्यंत मार्गी लावा अन्यथा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर मोर्चा काढू, असा इशाराच मराठा क्रांती मोर्चाने दिला आहे.

मराठा क्रांती मोर्चाची आज महत्वाची बैठक नाशिकमध्ये झाली. या बैठकीत मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकारला २ डिसेंबरपर्यंतचे अल्टिमेटम दिले आहे. येत्या २ डिसेंबरपर्यंत जर मराठा विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवले नाही तर शरद पवारांच्या बारामती येथील घरावर मोर्चा काढला जाईल. तसेच सर्व पक्षांच्या आमदारांना चोळी-बांगड्या भेट दिल्या जातील, अशी आक्रमक भूमिका मराठा क्रांती मोर्चाने घेतली आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या या इशाऱ्याने पुन्हा एकदा राज्यात मराठा आंदोलनाचा वणवा पेटण्याची शक्यता आहे.

मागील काही महिन्यांपासून रखडलेली अकरावीची प्रवेश प्रक्रिया २६ नोव्हेंबरपासून सुरु करण्यात आली. यात मराठा आरक्षणाशिवाय प्रवेश प्रक्रिया सुरु केल्याने लाखो मराठा विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. राज्य सरकारच्या या निर्णयानंतर मराठा समाजात संतापाचे वातावरण आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न जोपर्यंत मार्गी लागत नाही तोपर्यंत प्रवेश प्रक्रिया सुरु करु नये, अशी मागणी मराठा वर्गाकडून केली जात आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळायलाच हवे...
राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आज पुण्यात होते. यावेळी त्यांनी मराठा आणि ओबीसी आरक्षणाबाबतची भूमिका स्पष्ट केली आहे. मंत्रालयात झारीतले शुक्राचार्य खूप असल्याने अनेक अडचणी येत आहेत. राज्यात ५४ टक्के ओबीसी समाज आहे. त्यांचे आरक्षण जैसे थे राहायला हवे, आमचा मराठा आरक्षणाला विरोध नाहीये आणि तो कधीच नव्हता. मराठा समाजाला त्यांचे आरक्षण मिळायलाच हवे. पण ओबीसींच्या आरक्षाला धक्का न लागता, असे भुजबळांनी स्पष्ट केले.