औरंगाबाद / प्रतिनिधी
मागील तीन वर्षांपासून शहराच्या सांस्कृतिक घडामोडींचा शिल्पकार असलेल्या संत एकनाथ नाटयगृहाच्या नुतनीकरणाचे काम अतिशय संथ गतीने सुरू आहे. निधीअभावी या कामाला आजपर्यंत गती मिळालेली नाही. मात्र आता स्मार्ट सिटीच्या निधीतून उर्वरीत काम करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार आगामी दिड महिन्यात राहिलेले काम पूर्ण करा, असे आदेश महापालिका प्रशासक तथा आयुक्त अस्तिककुमार पांडेय यांनी कंत्राटदारासह अधिकार्‍यांना दिले आहेत.
तीन वर्षांपूर्वी तत्कालीन पालकमंत्र्यांनी संत एकनाथ रंगमंदिराच्या कामासाठी जिल्हा नियोजन समितीने अडीच कोटीचा निधी पालिकेला देऊ केला. त्यानंतर वातानुकुलीन यंत्रणा बसविण्याचा निर्णय पालिकेने घेतला. यामुळे काम आणि खर्च देखील वाढला. त्यामुळे निधीअभावी या कामाला गतीच मिळाली नाही. मागील अनेक दिवसांपासून प्रलंबीत असलेल्या या नाट्यगृहाच्या कामाची पाहणी शुक्रवारी दि.4 आयुक्त पांडेय, माजी महापौर नंदकुमार घोडेले, माजी उपमहापौर राजेंद्र जंजाळ, प्रमोद राठोड यांनी केली. हे काम मार्गी लावण्यासाठी तत्कालीन सभापती राजू वैद्य यांनीही पाठपूरावा केला आहे. तथापि, शुक्रवारी पाहणीत रंगरंगोटीच्या कामासह खुर्च्या लावण्याचे काम सुुरु होते. एसी लावण्याचे काम काही दिवसातच संपणार असल्याचे दिसून आले. नाट्यगृहाची दुरुस्ती पालिकेला करता आली नाही. त्यामुळे नाट्यगृहांच्या दुरावस्थेबाबत देशपातळीवरील रंगकर्मींनी त्यावेळी नाराजी व्यक्त केली होती. त्यावेळी आमदार अतूल सावे यांनी 50 लाख रुपये, तत्कालीन खासदार चंद्रकांत खैरे यांनी 50 लाख रुपये तत्कालीन पालकमंत्री रामदास कदम यांनी दोन कोटी रुपये देण्याचे आश्‍वासन दिले होते. यातील केवळ दोन कोेटी रुपये पालिकेकडे आहे. त्यातून उर्वरीत कामे करण्यात येत आहेत. काही प्रमाणात पालिकेनेही खर्च केला. पूर्ण काम आठ कोटी रुपयांचे आहे. त्यामुळे उर्वरीत निधी स्मार्ट सिटीतून देण्याचे प्रशासकांनी स्पष्ट केल्याचे घोडेले यांनी सांगितले.
कामाला 15 डिसेंबर 2018 ची मंजुरी
वास्तू विशारद प्रदीप देशपांडे, डी. पी. डीझाईन असोसिएट यांनी सार्वजनिक बांधकाम (विद्युत) विभागाच्या सन 2018-19 च्या दरसुचीनुसार विद्युतीकरणाच्या कामाचे 49 लाख 99 हजार 350 रूपयाच्या अंदाजपत्रकास पालिका प्रशासनाने तांत्रिक व प्रशासकीय मान्यता देत त्यावेळी प्रस्ताव स्थायी समितीसमोर मंजूरीसाठी ठेवला होता. स्थायी समितीने मंजूरी देत अल्प मुदतीच्या निविदा मागवून तातडीने कामाला सूरूवात करण्याचे आदेश सभापती राजू वैद्य यांनी दिले होते.
दुरूस्तीवरच तब्बल आठ कोटींचा खर्च
या कामासाठी पालिकेकडे दोन कोटी रुपयांचा निधी होता. पालिकेने त्यातून अत्यावश्यक कामांसाठी दिड कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तयार करत एसी आणि इतर कामे वाढवून अंदाजपत्रक आठ कोटी रुपयांवर नेले. यात खुर्च्यांसाठी दिड कोटी रुपये, एसीसाठी 2 कोटी 25 लाख रुपये यासह सिलिंग, पत्रे, स्टेज आणि इतर कामांसाठी 4 कोटी रुपयांचा अंदाज लावला. दहा जून 2019 पर्यंत केवळ एसीचे 1 कोटी रुपयांचे तर 38 लाख रुपयांचे खुर्च्यांचे कामे केले होते. त्यानंतर आजपर्यंत हे काम आहे त्याच स्थितीत पडून असल्याचे शुक्रवारी पाहणीत समोर आले