अमरावती - अमरावती शहरातील न्यू प्रभात कॉलनी येथे अपहरण केलेल्या बाळाच्या मृतदेह घरातल्याच विहिरीत आढळल्याने परिसरात खळबळ उडाली. शहरातील राजापेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. विहिरीत आढळलेले मृत बाळ हे केवळ दीड महिन्यांचे होते.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (२९ नोव्हेंबर) धौर्य सिंग या मृत बाळाच्या घरातील काही सदस्य लग्नासाठी गेले होते. ही संधी साधत अज्ञातांनी बाळाचे अपहरण केले. बाळ घरात नसल्याचे कळताच कुटुंबीयांनी शोध घेण्यास सुरुवात केली. परंतु ते न सापडल्याने राजापेठ पोलिस ठाण्यात बाळाच्या अपहरणाची तक्रार दाखल केली. कुटुंबीयांकडून तक्रार दाखल होताच पोलिसांनी तपास सुरु केला. बाळाचा शोध घेण्यासाठी पोलिस पथकाने डॉग स्कॉडचीदेखील मदत घेतली. परंतु त्या दिवशी बाळाचा शोध लागला नाही. मात्र दुसऱ्या दिवशी बाळाचा मृतदेह घरातीलच विहिरीत आढळल्याने खळबळ उडाली.

त्यानंतर पोलिसांनी धाव घेऊन घरात घुसून बाळाचे अपहरण नेमके कशासाठी केले आणि मृत्यूचे गूढ उलगडण्यासाठी घटनाथळावरून पुरावे शोधण्यास सुरुवात केली. बाळाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांना सुपूर्द करण्यात आला. पोलिस या घटनेचा पुढील तपास करत आहे.