कोल्हापूर - पाकिस्तानच्या कुरापती सुरुच असून शनिवारी पुन्हा शस्त्रसंधी उधळून लावत गोळीबार केला. पाकिस्तानच्या हल्ल्यात आपला आणखी एक जवान शहीद झाला. कोल्हापूर जिल्ह्यातील निगवे खालसा येथील संग्राम शिवाजी पाटील यांना पाकिस्तानच्या हल्ल्यात वीरमरण आले. एकाच आठवड्यात कोल्हापूर जिल्ह्यातील दोन जवानांना वीरमरण आल्याने पाकिस्तानविरोधात संतापाची लाट आहे.

मागील काही दिवसांपासून पाकिस्तानकडून सीमेवर कुरापती सुरूच असून भारतीय लष्कराकडून पाकला चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. परंतु शनिवारी सकाळी पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधी धुडकावून लावत अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात जवान संग्राम शिवाजी पाटील शहीद झाले.

कोल्हापूर जिल्ह्यातल्या निगवे खालसा या गावचे संग्राम पाटील हे राजौरी सेक्टर याठिकाणी कार्यरत होते. १६ मराठा अशोकचक्र बटालियनचे ते जवान होते. घाम गाळून शिवाजी पाटील यांनी आपल्या मुलांना शिकवले. संग्राम यांचा स्वभाव अगदी मनमिळावू होता. त्यांची लहानपणापासूनच सैन्यात जाण्याची इच्छा होती. सैन्यात जाण्यासाठी संग्राम यांनी आपले शरीर मजबूत केले.

मे महिन्यात संग्राम हे रिटायर होऊन गावी परतणार होते. संग्राम यांची १७ वर्ष सेवेची मुदत गेल्या वर्षी संपली होती. त्यानंतर त्यांनी दोन वर्ष मुदत वाढवून घेतली होती. गेल्या फेब्रुवारी महिन्यापासून ते घरी गेलेच नव्हते. फोनवरुनच कुटुंबियांची खुशाली ते जाणून घेत होते. निवृत्त झाल्यानंतर त्यांना अनेक गोष्टी करण्याची इच्छा होती. संग्राम पाटील शहीद झाल्याची बातमी समजताच कोल्हापूर जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.