नाशिक - आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत भारताचे प्रतिनिधत्व करणाऱ्या आणि सावरपाडा एक्सप्रेस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धावपटू कविता राऊत यांनी शासकिय नोकरीसाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली आहे. क्लास-१ च्या पदासाठी नियुक्ती व्हावी, अशी मागणी केली आहे. कविता यांनी २०१४ पासून क्लास-१ पदासाठी अनेकदा अर्ज केले. परंतु कवितानंतर अर्ज केलेल्या काही खेळाडूंची क्लास-१ पदासाठी शासकिय सेवेत नियुक्ती झाली परंतु कविता अजूनही नोकरीच्या प्रतिक्षेत आहे.

'२०१४ पासून क्लास-१ च्या पदासाठी अर्ज केलेल्यांची फाईल अजूनही प्रोसेसमध्येच आहे. मी वेळोवेळी फॉलोअप घेऊनही मला न्याय मिळालेला नाही. सध्या ओएनजीसीमध्ये देहरादूनला माझी पोस्टिंग केलेली आहे. मी ग्रामीण भागात लहानाची मोठी झालीय, ग्रामीण भागांतील खेळाडूंच्या समस्या माझ्यापेक्षा जास्त कोणी समजू शकत नाहीत. माझ्या ग्रामीण भागांतील खेळाडूंसाठी मला काम करायचेय. हाच विचार समोर ठेवून मी शासकिय नोकरीसाठी अर्ज केला होता. परंतु अद्यापही मला न्याय मिळाला नाहीये. माझ्यानंतर अर्ज केलेल्या खेळाडूंना पोस्टिंग मिळाल्या आहेत. मात्र, मला अद्यापही न्याय मिळालेला नाही. यासाठी मी खूप प्रयत्न केले, आजही माझे प्रयत्न सुरुच आहे. यामध्ये मला अनेक मंत्र्यांनीही मदत केली. पण तरी काम न झाल्याने माझे कुठे चुकतेय किंवा मी खेळात कुठे कमी पडलेय का? हा प्रश्न मला पडला आहे. खूप प्रयत्न केल्यानंतर राज्यपालांना भेटणे हा माझा शेवटचा पर्याय होता. शालेय शिक्षण आणि क्रिडा विभागाकडून माझ्या कामात अडचणी येत आहेत. माझी फाईल तिथून पुढे जात नाहीये. २०१८ मध्ये ज्या ३३ खेळाडूंची यादी जाहिर झाली होती, त्यात देखील माझे नाव नव्हते', अशी खंत कविता राऊत यांनी व्यक्त केली आहे.

ऑलम्पिक पार्टीसिपेंट, एशियन गेम्स डबल मेडल, कॉमन वेल्थ गेम्स मेडल, साऊथ एशियन गेम्स गोल्ड मेडल, नॅशनल गेम्स रेकॉर्ड होल्डर, अर्जुन पुरस्कार, अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलेल्या आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊतांनी प्रथम दर्जाच्या नियुक्तीसाठी राज्यपालांची आज भेट घेतली आहे.