(संग्रहित फोटो)

मुंबई - मागील 8 दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाचा धोका कायम आहे. पुन्हा महाराष्ट्रासाठी पुढील 48 तासांत मुसळधार पाऊस होण्याची अंदाज वर्तवण्यात आला आहे.

मागील 8 दिवसांत इतका पाऊस झाला की गावे आणि शेत पाण्याखाली गेली आहेत. शहरांना नद्यांचे स्वरुप आले आहे. आता पुन्हा एकदा हवामान खात्याने मुसळधार पाऊस बरसणार असल्याचे म्हटले आहे. राज्यातील शेतकरी, मच्छिमार, नागरिकांनी काळजी घ्यावी, असेही आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.

दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि आजूबाजूच्या दक्षिम कोकण प्रदेशात अद्यापही कमी दाबाचे क्षेत्र कायम आहे. त्यामुळे पुढील 48 तासांत महाराष्ट्र आणि दक्षिण गुजरात किनारपट्टीवर कमी दाबाच्या पट्टयाची तीव्रता वाढेल आणि हा पट्टी वायव्येकडे सरकत जावून तीव्र स्वरुपाचा होईल, त्यामुळे मुसळधार पावसाची शक्यता आहे, अशी माहिती हवामान खात्याने दिली.

या काळात मच्छिमारांनी समुद्रात जावू नये, असा इशारा विभागाकडून देण्यात आला आहे. सखल भागांत पूर, पाणी साचणे, वाहतुकीत अडथळे, भूस्खलन होईल आणि पाणी साचेल, तसेच रस्ते ओले आणि निसरडे होतील. अतिवृष्टीमुळे नाल्यांमध्ये अडथळे येवून अचानक पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याचा इशाराही हवामान खात्याने दिला.

या मुसळधार पावसामुळे मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा हे भाग तर पुणे मुंबई ही शहर जलमय झाली आहेत. मराठवाड्यासह इतर भागांतील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेले पीक परतीच्या पावसाने वाया गेल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. अशातच पुन्हा एकदा अतिमुसळधार पावसाची शक्यता म्हणजे, शेतकऱ्यांना जे उरले आहे तेही हाती लागणार नाही, अशी स्थिती झाली आहे.