मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील महिन्यात अहमदाबाद, पुणे आणि हैदराबादमध्ये कोरोना लसच्या निर्मिती प्रक्रियेची पाहणी केली. त्यानंतर काही राज्यांत लसीकरणाची पूर्वतयारी केली जात आहे. दरम्यान, राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी कोरोना लसीबाबत महत्वाची माहिती दिली आहे.

'केंद्र सरकार कोरोना लसीबाबत मायक्रो प्लॅनिंग करत असून लस देण्यासाठी कार्यपद्धती आखली जात आहे. ज्या तारखेला लस द्यायची आहे, त्या व्यक्तीला मेसेज केला जाईल, ती व्यक्ती आल्यावर तीची ओळख पटलीनंतर लस दिली जाईल' अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

लस देण्यासाठी केंद्र सरकार माहिती मागवत आहेत. आरोग्य कार्मचाऱ्याचा डेटा, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, ५० वर्षांवरील नागरिक, आजारी असलेले लोक असा सर्व डेटा आम्ही तयार करत आहोत. १८ हजार लोकांना ट्रेनिंग देण्याचे काम पूर्ण होणार आहे. लस स्टोरेजसाठी कोल्डचेनची व्यवस्था झालीये. उत्तर प्रदेशात आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द केल्या आहेत, परंतु आपल्याला तसे करायचे नाही. आपल्याकडे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध आहे. जर गरज पडली तरच सुट्या रद्द होतील, असेही राजेश टोपेंनी स्पष्ट केले आहे.

आम्हाला खात्री आहे की, लस केंद्र सरकार पुरवेल. जी कामे राज्य सरकारने करायची आहेत ती आम्ही करतच आहोत. लसीकरणाच्या परिणामाबाबत एक युनिट तयार करण्यात आले आहे. साधारण दोन कंपन्या सिरम आणि भारत बायोटेक यांनी लसीबाबत केंद्राकडे परवानगी मागितली आहे. आता केंद्राला निर्णय घ्यायचा आहे. लसीकरण कार्यक्रमासाठी आम्ही तयार आहोत. डिसेंबर शेवटपर्यंत केंद्राने परवानगी दिली तर जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात होईल, असेही राजेश टोपेंनी सांगितले.