मुंबई - एकनाथ खडसे राष्ट्रवादीत जाण्याने भाजपला काहीही फरक पडणार नाही, त्यांच्यासोबत एकही आमदार, पदाधिकारी, कार्यकर्ता राष्ट्रवादीत जाणार नाही, असा दावा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे. तसेच खडसेंना वापर राज्याच्या भल्यासाठी करावा, विरोधकांसाठी नाही, अशी टीकाही दानवेंनी केली आहे.

एकनाथ खडसेंनी भाजप प्रदेशाध्यक्ष पद घेतले असते, तर ते कदाचित मुख्यमंत्री झाले असते. त्यांनी प्रदेशाध्यक्ष पद नाकारले आणि देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष झाले. खडसेंना प्रदेशाध्यक्षापेक्षा मंत्रीपद महत्वाचे होते. आता परिस्थितीत सुधारण होणार नाही, असे त्यांना वाटले असेल, म्हणून खडसेंनी पक्ष सोडला. नाथाभाऊ आमचे नेते होते, त्यांनी पक्ष सोडल्याचे दु:ख आहे. परंतु पक्ष केवळ एकावर अवलंबून नसतो. खडसेंसोबत एकही आमदार, पदाधिकारी जाणार नाही, याची खात्री आहे. एकनाथ खडसेंचा भाजपसाठी विषय संपलेला आहे, असेही रावसाहेब दानवे म्हणाले.

'मी खडसेंच्या फार्महाऊसवर, घरी गेलो होतो, मी त्यांना समजावले नाही. परंतु राजकारणावर बराच वेळ चर्चा झाली. जे चाललेय त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करत होतो. भाजपने २०१९ मध्ये राष्ट्रवादीला मोठे नुकसान पोहोचवले होते. त्यामुळे खडसेंना राष्ट्रवादीत घेवून, ते नुकसान भरुन काढण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी करत आहे. परंतु खडसे जाण्याचे भाजपला काहीही फरक पडणार नाही.' असे रोखठोक मत दानवेंनी मांडले.