औरंगाबाद / प्रतिनिधी
वर्तमानपत्रात जाहिरात देऊन सहायक प्राध्यापक पदांच्या जागा भरण्यासोबतच बनावट कागदपत्रे जोडून संस्था व शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी माजी सचिव, प्राचार्य व इतर कार्यालयीन कर्मचा-यांविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 2019 ते 2020 याकाळात बायजीपुरा, संजयनगर भागात घडला. याप्रकरणात माजी सचिव विनोद जाधव, प्राचार्य कमलेश ठाकुर व इतरांचा समावेश आहे.
बाबुराव रामदास पवार (62, रा. प्लॉट क्र. 21, वसंतनगर, जवाहर कॉलनी) हे निसर्गदीप शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आहेत. जुन 2019 या वर्षात निसर्गदीप शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यपदी त्यांची निवड झाली. या संस्थेमार्फत चितेपिंपळगाव येथे श्री तुळजाभवानी वरिष्ठ कला व विज्ञान महाविद्यालय चालविले जाते. पवार हे अध्यक्ष होण्याअगोदर संस्थेचे सचिव विजेंद्र गुलाबसिंग जाधव (रा. बंजारा कॉलनी, खोकडपुरा) हे होते. त्यानंतर पवार यांनी संस्थेचे माजी सचिव जाधव यांना 2019-2020 याकाळात संस्थेअंतर्गत येणा-या महाविद्यालयाची कायम विनाअनुदानित पदवी अभ्यासक्रमाबाबत सहायक प्राध्यापक पदाच्या 27 शिक्षक पदांच्या भरती बाबतच्या कागदपत्रांची मागणी केली. मात्र, त्यांनी भरतीची कोणतीही कागदपत्रे दिली नाही. वारंवार कागदपत्रांची लेखी व तोंडी मागणी केल्यानंतर जाधव यांनी कागदपत्रे देण्यास टाळाटाळ केली. भरती बाबतची कागदपत्रे न दिल्याने संस्थेचे सहसचिव मांगीलाल गोवर्धन चव्हाण यांच्या वतीने 31 जानेवारी रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडे संस्थेने सहायक प्राध्यापक पदाच्या भरतीच्या मान्यतेच्या सर्व कागदपत्रांच्या सत्यप्रती मिळाव्या म्हणून माहितीच्या अधिकाराखाली अर्ज सादर केला. याबाबत सर्व माहिती 12 फेब्रुवारीला संस्थेचे सहसचिव मांगीलाल चव्हाण यांना प्राप्त झाली. त्यानंतर या माहिती व कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. संस्थेचे माजी सचिव जाधव, प्राचार्य ठाकुर व इतर कार्यालयीन कर्मचारी यांनी जाधव यांचे नातेवाईक सुरजीत आसाराम राठोड (रा. गल्ली क्र. 6-बी, संजयनगर) यांच्या घरात संस्थेचे कार्यालय थाटले. तेथे निसर्गदीप शिक्षण प्रसारक मंडळाच्या चितेपिंपळगावातील महाविद्यालयाची कायम विनाअनुदानित पदवी अभ्यासक्रमाबाबत शिक्षकांची पदे भरण्याकरीता सन 2019-2020 या वर्षात 30 जुलै 2019 रोजी विद्यापीठाने प्रस्तावाला मंजुरी दिली. त्यानंतर रिक्त जागा भरण्याबाबत एका वर्तमान पत्रात 1 ऑगस्ट 2019 रोजी जाहिरात दिल्याचे भासविण्यात आले.
दैनिकात जाहिरात दिल्याचे भासवले
दैनिकात खोटी जाहिरात तयार करुन प्रस्तावासोबत सादर करण्यात आली. त्यानंतर 26 ऑगस्ट 2019 रोजी सहायक प्राध्यापकांना मान्यता मिळण्याचा प्रस्ताव खोटी व बनावट कागदपत्रे तयार करण्यात आली. 23 जुन 2019 रोजी प्रस्ताव मंजूरीअगोदच यादीतील 27 सहायक प्राध्यापाकांना नेमणुकीचे लेखी आदेश दिले. सोबतच यादीतील 27 सहायक प्राध्यापक इतरत्र कोठेही नेमणुकीस नसल्याचे हमी पत्र दिले.
प्रकार असा आला उघडकीस
सहायक प्राध्यापक जे. पी. सिंगल हा बार्शीच्या भाऊसाहेब आडसूळ महाविद्यालयात तर नाशिकच्या वसंतराव नाईक कला व वाणिज्य महाविद्यालयात संदीपसिंग नानूसिंग चव्हाण हे व इतर सहायक प्राध्यापक म्हणून पुर्णवेळ कार्यरत असल्याचे समोर आले. हा प्रकार उघडकीस आल्यावरुन जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक दत्ता शेळके करत आहेत.