नाशिक - महापालिकेमधील शिवसेना गटनेते अजय बोरस्ते यांच्या कार्यालयाला आग लागल्याची घटना नुकतीच घडली आहे. महापालिकेच्या दुसऱ्या मजल्यावरील कार्यालयाला ही आग लागली आहे. अग्निशमन दलाचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी पोहोचलेले आहेत. अग्निशमन दलाचे कर्मचारी आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करत असल्याची माहिती मिळाली आहे. 

आगीची भीषणता खूपच तीव्र असल्याने आगीत महत्वाचे साहित्य जळून खाक झालेले आहे. महापालिका कर्मचाऱ्यांनी आग लागलेल्या खोलीचे दरवाजे तोडलेले आहे. सध्यातरी आगीच्या कारणाचा प्राथमिक अंदाज सांगता येणार नाही. नंतर आगीच्या कारणाची सविस्तर चौकशी करु, असे महापालिकेच्या अधिकारी म्हणाले आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. अग्निशमन दलाच्या 2 गाड्या याठिकाणी पोहोचलेल्या आहेत. सुदैवाने शिवसेनेचे कुणीही पदाधिकारी कार्यकर्ते कार्यालयात उपस्थितीत नव्हते. अनेक कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची विविध कामांसाठी कार्यालयात येत जात असतात. मात्र आज सुदैवाने सॅनिटायझिंगचे काम सुरु असल्याने स्वच्छता कर्मचाऱ्यांशिवाय कार्यालयात कुणीही उपस्थित नव्हते.