जळगाव : मुलगी अपशकुनी असल्याच्या संशयावरून बापानेच पोटच्या मुलीचा घातपात केल्याची तक्रार मृत मुलीच्या मामाने पोलिसात दिली. या तक्रारी आधारे पोलिसांनी मृत मुलीचा मृतदेह कब्रस्तानातून बाहेर काढून शवविच्छेदन करण्याचा निर्णय घेतल्याने खळबळ उडाली आहे.

जळगाव शहरातील पिंप्राळा हुडको येथे राहणाऱ्या जावेद शेख यांच्या कनीज शेख या अकरा वर्षीय मुलीचा 25 एप्रिलला मृत्यू झाला होता. या मृत्यूनंतर तिचा दफनविधीही करण्यात आला होता. मात्र, या घटनेनंतर तिचे मामा अझहर शौकत अली यांनी जळगाव शहरातील रामानंद पोलिसात तक्रार अर्ज देत मुलीचे वडील कनीजचा अपशकुनी समजून तिरस्कार करत असल्याने त्यांनीच तिचा घातपात केल्याचा संशय व्यक्त केला.

या तक्रार अर्जाची दखल घेत पोलिसांनी आज पिंप्राळा हुडको परिसरातील कब्रस्तानमधून मृत मुलीचा मृतदेह बाहेर काढून त्याचे शवविच्छेदन करण्याचा निर्णय घेतलाय. या शवविच्छेदनानंतर जो अहवाल येईल त्यानुसार पोलीस कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

केमिस्टचे काम करणाऱ्या जावेद अख्तर शेख जमालोद्दिन हा पत्नी व कानीज फातेमासह राहतो. कानीजच्या जन्मानंतर काही दिवसांत दिवसांत जावेदच्या आईचे निधन झाल्याने कनीज फातेमा नावाची ही मुलगी कुटुंबासाठी अपशकुनी आहे, असा समज होऊन जावेदने तिचा छळ सुरू केला होता, असे तिचा मामा व तक्रारदार अजहर अली शौकत अली यांनी आरोप केला आहे. या पार्श्वभूमीवर कनीजचा खरच काही घातपात झाला आहे की अन्य कारणाने तिचा मृत्य झालाय, याचा पोलिस तपास करत आहेत. 

२५ एप्रिलच्या रात्री दीड वाजेच्या सुमारास जावेदने घरमालक आरीफ खान यांना झोपेतून उठवले आणि आपल्या मोठ्या मुलीचे निधन झाल्याचे त्यांना सांगितले. मामाला हा सगळा प्रकार कळाल्यानंतर त्याने भाचीवर केलेल्या छळाबाबत पोलीसात तक्रार अर्ज केला.