मुंबई : मागील ४० वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून राजकारणात सक्रीय असलेले भाजपचे बंडखोर नेते एकनाथ खडसे आज (दि 23) शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यांच्या पक्षप्रवेशासाठी राष्ट्रवादीने कार्यालयात जय्यत तयारी केली आहे. राष्ट्रवादीच्या 11 दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत खडसेंचा पक्षप्रवेश झाला आहे. परंतु मात्र प्रकृती ठिक नसल्याने अजित पवार या सोहळ्याला उपस्थित राहीले नाहीत.

राष्ट्रवादी प्रवेशासाठी खडसे गुरुवारीच (दि.२३) दुपारी विशेष चार्टर्ड हेलिकॉप्टरने कुटुंबियांसह मुंबईला आले. त्यांच्यासोबत पत्नी मंदाकिनी खडसे आणि कन्या रोहिणी खडसेही आहेत.

जयंत पाटील हे राष्ट्रवादी कार्यालयात दाखल झाले असून ते म्हणाले, 'खडसेसाहेबांवर अन्याय झाला, षडयंत्रे रचले गेले असेल. खडसेंच्या अन्यायबाबत मीच सर्वात जास्त बोललो असेल. एकनाथ खडसेंनी विधीमंडळाचा सदस्य काय करु शकतो हे दाखवून दिले. त्यांची विरोधी पक्षनेते म्हणून ताकदही आम्ही पाहिली. खडसेंचा एक दिग्गज नेता मंत्री झाला, मात्र पहिल्या रांगेतील नेत्याला सभागृहातील मागच्या रांगेत बसवण्याचे काम भाजपने केले. खडसेंवरील अन्यायावर सभागृहात सर्वात जास्त मीच बोललो. कटप्पाने बाहुबली को क्यो मारा असा प्रश्न मी विचारला, पण त्याचे उत्तर मला अद्यापही मिळालेले नाही. आजही त्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही. आजही ते टीव्ही पाहात असतील. आज त्यांना कळाले असेल की टायगर अभी जिंदा है, पिक्चर अभी बाकी है हे आता त्यांना कळेल.भाजमध्ये खडसेंनी आपलं मोठं योगदान दिलं पण काना मागून आला आणि तिखट झाला,' असा टोला जयंत पाटीलांनी नाव न घेता देवेंद्र फडणवीसांना लगावला.

एकनाथ खडसे म्हणाले...
'संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे, माझा किती छळ झाला, माझ्यावर अन्याय झाला. मी विधानसभेतही विचारले, की माझा गुन्हा काय? जर माझा काही गुन्हा असेल तर त्याचे कागदपत्र दाखवा. मी खूप संघर्ष केला. हा संघर्ष केवळ भाजपमध्येच नाही, तर अगदी मंत्रिमंडळातही केला. संघर्ष माझ्या पाचवीला पूजलेला आहे. उत्तर महाराष्ट्रात भाजपला 6 खासदारकीच्या जागा यायच्या. येथे मी सातत्याने 5 जागा जिंकून आणल्या. माझ्या 40 वर्षांच्या राजकारणात मी कधीच बाईला समोर ठेवून राजकारण केले नाही. मी दिल्लीत वरिष्ठांशी चर्चा केली. त्यावेळी ते म्हणाले, नाथाभाऊ आता तुम्हाला इथे भवितव्य नाही. पक्ष बदलायचा तर बदला, राष्ट्रवादीत जायचे तर जा. तसेच त्यांनी माझ्या मागे ईडी लावली तर मी सीडी लावेल,' अशा इशाराही खडसेंनी दिला.

शरद पवार म्हणाले....
'आजचा आनंदाचा दिवस आहे. बरेच लोक राष्ट्रवादीत येण्यास उत्सुक आहेत. या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कष्ट करण्याची इच्छा आहे. धुळे, जळगावमध्ये पक्ष वाढविण्याची गरज होती. जवळगाव हा एकनिष्ठेने काम करणारा जिल्हा. एकेकाळी खडसेंनी भाजपची नवी पिढी घडवली. खानदेशात नवे नेतृत्व उभे करण्याचे काम खडसेंनी केले आहे. त्यामुळेच त्यांना भाजपचे अनेक आमदार खासदार निवडून आणता आले. यापुढे जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचाराने चालेल. खडसेंचा अनुभव पक्षाला अनुभवाचा ठरेल. नाथाभाऊंनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने आता संपूर्ण खांदेश राष्ट्रवादीमय होईल, यात मला शंका नाही. एकदा शब्द दिला म्हणजे दिला, त्यावरून नाथाभाऊ मागे हटत नाहीत, नाथाभाऊ काय चीज आहे तुम्हाला दाखवून देऊ, असे शरद पवार म्हणाले.'