मुंबई - ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीचे सर्वोसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत आज हातावर घड्याळ बांधली आहे. खडसेंनी पक्षप्रवेश करताच भाजपबाबत अनेक गौप्यस्फोट केले. इतकी वर्षे भाजपसाठी एकनिष्ठेने काम केले. आता राष्ट्रवादी पक्षवाढीचे एकनिष्ठेने काम करेन, असेही खडसे म्हणाले. खडसेंसह तब्बल ७२ नेत्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

खडसेंसह 'या' नेत्यांनी केला प्रवेश...
एकनाथ खडसे यांच्यासोबत नंदुरबार तळोदाचे माजी आमदार नरेंद्र पाडवी, जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे – खेवलकर, बोदवडचे कृषी उत्पन्न बाजार सभापती निवृत्ती पाटील, मुक्ताईनगरचे सभापती प्रल्हाद जंगले, बोदवडचे सभापती किशोर गायकवाड, भुसावळचे सभापती मनिषा पाटील, भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे सदस्य कैलास सुर्यवंशी, जळगाव जिल्हा दूध फेडरेशनचे अध्यक्षा मंदाकिनी खडसे, मुक्ताई सहकारी सुतगिरणीचे उपाध्यक्ष राजू माळी, औरंगाबादचे माजी महापौर सुदाम सोनवणे अशा ७२ नेत्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

भाजप सोडण्यापूर्वी मी दिल्लीतल्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी बातचित केली. परंतु ते मला म्हणाले की, तुम्हाला आता पक्षात संधी नाही. तुम्हा राष्ट्रवादीत जा. त्यानंतर मी राष्ट्रवादीत येण्याचा निर्णय घेतला, असे म्हणून एकनाथ खडसेंनी मोठा राजकीय गौप्यस्फोट केला.