मुंबई : एनसीबीने मुंबईत क्रूजवर छापा टाकून आर्यन खानसह एकूण ८ आरोपींना अटक केले आहे. हे प्रकरण राज्यात चांगलचं पेटले आहे. राज्याच्या राजकीय वर्तुळात देखील या प्रकरणावरून मोठ्या प्रमाणावर आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. या पार्श्वभूमीवर ही कारवाई करणारे एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी मुंबई पोलीस आपल्यावर पाळत ठेवत असल्याचा खळबळजनक आरोप करत त्याविषयी तक्रार केली. यासंदर्भात आता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मोठा खुलासा केला आहे. मुंबईत प्रसारमाध्यमांनी यासंदर्भात विचारणा केल्यानंतर त्यांनी यावर आपली भूमिका मांडली आहे.
समीर वानखेडे यांच्या आरोपांमुळे राज्यातले वातावरण तापले असतानाच मुंबई पोलिसांच्या प्रतिमेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले आहे. त्यामुळे या संदर्भात महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरते. त्यामुळे प्रसारमाध्यम प्रतिनिधींनी यासंदर्भात विचारणा करताच गृहमंत्र्यांनी तशा कोणत्याही सूचना कुणाला दिल्या नसल्याचे सांगत समीर वानखेडेंचे आरोप फेटाळून लावले.
मंञी वळसे पाटील म्हणाले, मला वाटत नाही की मुंबई पोलिसांचे अधिकारी वॉच ठेवतात वगैरे. तशा कोणत्याही सूचना कुणालाही दिलेल्या नाही, असे दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. तसेच, त्यांच्या आरोपांविषयी आपल्याला फार माहिती नाही, त्याची अतिरिक्त माहिती घेऊन मी त्यावर बोलेन, असे देखील वळसे पाटील यावेळी म्हणाले.