मुंबई - महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाले असून त्या पार्श्वभूमीवर भाजपकडून सरकारवर त्यांच्या कामावरून टीका केली जात आहे. आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामनाला दिलेल्या मुलाखतीत धमकीची भाषा वापरल्याचा आरोप त्यांनी केला आहे. धमकी देणारा मुख्यमंत्री आपण इतिहासात कधीच पाहिला नाही अशी टीका फडणवीसांनी केली. फडणवीसांच्या या टीकेला सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

'देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी कशा धमक्या दिल्या, याच्या व्हिडीओ क्लिप आहेत. त्या बाहेर काढायला लावू नका', असा इशारा धनंजय मुंडेंनी फडणवीसांना दिलाय. 'उद्धव ठाकरे हे ज्या संस्कारात लहानाचे मोठे झाले. त्यात त्यांना धमकावणे कधी जमले नाही. एखादी व्यक्ती बदनाम होत नसेल तर त्या व्यक्तीला विविध पद्धतीने बदनाम करण्याची भाजपची जुनीच पद्धत आहे', अशा शब्दांत धनंजय मुंडेंनी टीकास्त्र सोडले.

महाविकास आघाडी सरकारच्या १ वर्षाच्या कार्यकाळात कोरोनासारखे मोठे संकट आले. या संकटात २ लाखापर्यंत कर्जमाफीचा निर्णय, नियमित कर्ज फेडणाऱ्या कर्जदारांना ५० हजार रुपये, असे अनेक महत्वाचे निर्णय सरकारने घेतले.केंद्राकडे राहिलेले जीएटीचे पैसे मिळाले नाही म्हणून आर्थिक निर्बंध लादले. हे आर्थिक निर्बंध आणि कोरोनामुळे विकासाची गती मंदावल्याची खंत देखील मुंडेंनी व्यक्त केली.

काय म्हणाले होते फडणवीस...
'महाविकास आघाडी सरकारला १ वर्ष पूर्ण झाले. परंतु त्यांची अचिव्हमेंट काय आहे? मुख्यमंत्र्यांनी सामनाला मुलाखत दिली, पण त्यात वर्षपूर्तीचा आढावा हवा होता, प्रश्न कसे सोडवणार, याचे व्हिजन आवश्यक होते. परंतु ते काहीच दिसले नाही. मुलाखतीत फक्त धमक्या दिसल्या. मुख्यमंत्री संयमी आहेत हे ऐकून होतो पण दसरा मेळाव्याचे भाषण असो की कालची मुलाखत यातून ते संयमी नसल्याचे दिसून आले. हात धुवून मागे लागू, खिचडी शिजवू, ही कोणती भाषा? तुम्ही संविधानिक पदावर आहे. अशा प्रकारची भाषा मुख्यमंत्र्यांना शोभत नाही. या मुलाखतीत विकासावर अजिबात चर्चा नाही. चर्चा कशावर तर कुणाच्या मागे हात धुवून लागू आणि कुणाची खिचडी शिजवू यावर मुलाखतीचा भर होता.' अशी टीका फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर केली.