मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेले पॅकेज हे अतिशय फसवे ही मदत तोंडाला पाने पुसणारी आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. शेतकऱ्यांना अतिशय तोकडी मदत देताना, त्यांनी केवळ बहाणे शोधलेत. शेतकर्‍यांचे झालेले प्रचंड नुकसान पाहता त्यांनी जाहीर केलेली मदत ही तोंडाला पाने पुसणारी असल्याचेही ते म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवरुन सरकारने जाहीर केल्या पॅकेजवर नाराजी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी यांनी आपला शब्द फिरवत आज जाहीर केलेले पॅकेज हे अतिशय फसवे आहे. यापूर्वी २५ हजार आणि ५० हजार रूपये हेक्टरी मदतीची मागणी मुख्यमंत्र्यांनीच केली होती. फळबागांसाठी तर एक लाखांपर्यंत मदत त्यांनी मागितली होती. पण आता ती मदत द्यायची नसल्याने केंद्र सरकारवर जबाबदारी ढकलण्याचा केविलवाणा प्रयत्न ते करीत असल्याचे म्हणत फडणवीसांनी निशाणा साधला.

नियमित अर्थसंकल्पातील आकड्यांनाच पॅकेज भासवून मलमपट्टी केल्याचा आव सरकार आणू पाहत असल्याचे ते म्हणाले. पण केवळ देखावा निर्माण करून शेतकर्‍यांना अजीबात मदत मिळणार नाही. बहाणेबाजी करून महाविकास आघाडी सरकारने शेतकर्‍यांची घोर निराशा आणि फसवणूक केल्याचे फडणवीस म्हणाले.

किमान शेतकर्‍यांच्या बाबतीत तरी आणि झालेल्या नुकसानीची तीव्रता पाहता अशा काल्पनिक आकड्यांची धूळफेक मुख्यमंत्री करतील असे वाटले नव्हते असे फडणवीस म्हणाले. हा शेतकर्‍यांसोबत झालेला मोठा विश्वासघात आहे. निसर्गाने तर अन्याय केलाच, आता सरकारही सूड घेत असल्याची टीकाही फडणवीसांनी ठाकरे सरकारवर केली.