नागपूर : शिवसेनेने पेट्रोल डिझेलच्या भाववाढीवर आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका करत सेनेने मोर्चे काढण्याची नौटंकी करू नये. राज्य सरकारने पेट्रोल डिझेलवरचे टॅक्सेस कमी करावेत आणि भाववाढ नियंञणात आणावी, असे फडणवीस म्हणाले आहे. फडणवीस नागपुरात बोलत होते.
 देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, मागील काळात आम्ही सरकारमध्ये होतो. त्यावेळी पेट्रोल डिझेल दरवाढ झाली होती. त्यावेळी, मी आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी पेट्रोल डिझेलवरचा राज्याचा कर कमी करून पेट्रोल डिझेलचे दर 2 रुपयांनी कमी केले होते. आताच्या सरकारने पेट्रोल डिझेलवर कर कमी करावा आणि पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करुन दाखवावेत. उगीचच मोर्चे काढण्याची नौटंकी करु नये". अशी टीका फडणवीस यांनी शिवसेनेवर केली आहे. 

सेनेने का हिंदुत्व सोडले ? : हिंदुत्वावर कुणाचीही मक्तेदारी असू शकत नाही. पण उद्धव ठाकरेंना माझा स्पष्ट सवाल आहे, की तुम्ही हिंदुत्व का सोडलेय.  हिंदुत्व हे जगावे लागते…. ज्यावेळी जनाब बाळासाहेब होतात, आणि अजान स्पर्धा सुरु होते त्यावेळी भाजपच्या हिंदुत्वावर मुख्यमंत्र्यांना बोलावे लागते, असा हल्लाबोल फडणवीस यांनी मुख्यमंञ्यांवर केला आहे. 

शरजीलला सरकार सरकार पाठिशी घालतंय : राम मंदिरचे पैसे जनतेने द्यावे, की सरकारने द्यावे. यावर सामनाचा अग्रलेख येतो पण शरजील प्रकरणावर अग्रलेख यायला 4 दिवस लागतात. यावरुनच कळते की सरकार शरजीलला पाठीशी घालतंय आहे. आम्ही ज्यावेळी आंदोलन केले, त्यावेळी सरकारला जाग आली आणि कार्यवाही करण्याचे सांगितले आहे, असे फडणवीस म्हणाले आहे.