पुणे : राज्यात कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार  यांनी तातडीने पुण्यातील कौन्सिल हॉलला जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक घेतली. कोणत्याही परिस्थितीत जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे. यासाठी नियमांची कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना अजित पवार यांनी  या बैठकीत अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता सूक्ष्म नियोजन करा, असे देखील अजित पवार यांनी बजावले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज कोरोनाच्या पार्श्वभूमिवर पुण्यात बैठक घेतली. त्यावेळी, त्यांवी वरील सूचना दिल्या. या बैठकीला मंत्री दिलीप वळसे-पाटील, मंत्री दत्तात्रय भरणे, खासदार गिरीश बापट, खासदार श्रीरंग बारणे, खासदार वंदना चव्हाण, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, तसंच विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महापालिका आयुक्त विक्रमकुमार, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख उपस्थित होते.

नागरिकांनो गर्दीत जाणे टाळा : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी गर्दीत जाणे टाळणे, सामाजिक अंतर पाळणे, मास्क, सॅनिटायझरचा वापर आदी प्रशासनाने घालून दिलेल्या सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे.  200 व्यक्तींच्या मर्यादेत लग्न, कौटुंबिक व राजकीय कार्यक्रम होतील याची दक्षता घ्या. जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालये २८ फेब्रुवारी पर्यंत बंद ठेवावीत. मात्र अभ्यासिका निम्या क्षमतेने नियम पाळून सुरू राहतील याची खात्री करा. हॉटेल, बार रात्री ११ पर्यंतच सुरु राहतील याची दक्षता घ्या, असे सांगून रात्री 11 ते सकाळी 6 दरम्यान नियंत्रित संचाराची अंमलबजावणी करा, अशा सूचना अजित पवार यांनी दिल्या आहे.

मास्क न वापरणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करा : पुण्यातील नियंत्रित संचाबंदीतून वृत्तपत्र, दूध, भाजीपाला, फळे, औषधे या अत्यावश्यक सेवांना सुट देण्यात आली आहे.जिल्ह्यात सर्वत्र कोविड केअर सेंटर तात्काळ सुरु करा. मास्क न वापरणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करा, असे आदेश अजित पवार यांनी दिले आहे.

या दिल्यात अजित पवारांनी सूचना
१)कोणत्याही परिस्थितीत जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे. यासाठी नियमांची कडक अंमलबजावणी करा.
२)कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता सूक्ष्म नियोजन करा.
३)शहर व ग्रामीण भागात हॉटस्पॉटनिहाय अधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपवा.
४)सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रात प्रभावी उपाययोजना राबवा
५)संपर्क शोध मोहीम (कॉन्टॅक्ट ट्रेसिंग) अधिक प्रभावीपणे राबवा.
६)शासकीय आणि खाजगी प्रयोगशाळांमध्ये पूर्ण क्षमतेचा वापर करुन नमुना तपासण्या वाढवा.
७)आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत गृहभेटीद्वारे सुपर स्प्रेडर व सारी रुग्णांचे सर्वेक्षण करा
८) संसर्ग रोखण्यात खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांची भूमिका महत्त्वाची आहे. यासाठी त्यांनी फ्लू सदृश रुग्णांची तपासणी करुन घ्यावी.