पुणे :राज्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढत असून कोरोना परिस्थिती पूर्ण निवळल्याशिवाय एकही कॉलेज उघडणार नाही, असे राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सांगितले आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची बैठक संपल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सामंत म्हणाले की, राज्यातील कोरोनाचा प्रसार किती प्रमाणात होत आहे. यावर कॉलेज सुरु करण्याचा निर्णय घेण्यात येईल. कोरोनाची परिस्थिती पूर्ण निवळल्याशिवाय राज्यातील कॉलेज सुरु होणार नाही, असे सामंत यांनी स्पष्ट केले.
गृहमंत्रालयाने सोमवारी देशभरातील शाळा उघडण्याबाबतची मार्गदर्शक तत्वे जारी केली आहे. येत्या 15 ऑक्टोबरपासून देशातील शाळा उघडण्यासाठी केंद्र सरकारने अनलॉकअंतर्गत सांगितले आहे.त्या पार्श्वभूमीवर उदय सामंत यांना कॉलेज सुरु करण्याबाबतचा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा उदय सामंत यांनी ही माहिती दिली.

ग्रंथालयही सुरु करण्याचे प्रयत्न : 
तसेच अंतिम वर्षातील दिव्यांग विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी 20 मिनिटे वेळ वाढवून दिला जाणार आहे. त्यामुळे एकाही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही. तसेच येत्या काही दिवसात ग्रंथालयही सुरु करण्याचे प्रयत्न केले जात आहे. यासंदर्भात एक बैठकही पार पडली आहे,असेही त्यांनी स्पष्ट केले.