मुंबई - परतीच्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठी घोषणा केली आहे. शेतकऱ्यांसाठी त्यांनी १० हजार कोटींची मदत दिली जाणार असल्याचे सांगितले. केंद्र सरकारचे काही निकष आहेत, त्यापेक्षा अधिक मदत दिली जात आहे, असेही ते म्हणाले.

१० हजार रुपये प्रति हेक्टर मदत केली जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. केंद्र सरकारकडून महाराष्ट्राच्या हक्काचे ३८ हजार कोटी येणे बाकी आहे, ते पैसे मिळवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पूर आणि अतिवृष्टीग्रस्तांना मदतीबाबत आढावा बैठक पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, अनिल परब उपस्थित होते. शेतकऱ्यांना दिवाळी आधीच ही मदत पोहोचेल, अशी व्यवस्था करु असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

फळपिकांसाठी १८ हजार रुपये प्रति हेक्टर ऐवजी आता २५ हजार प्रति हेक्टर मदत दिली जाणार आहे. या नुकसान भरपाईमध्ये शेतजमिनीची दुरुस्ती, रस्त्यांची दुरुस्ती आणि इतर नुकसान भरपाईचा समावेश आहे. जिरायत, बागायत जमिनीसाठी 6800 प्रति हेक्टर ही केंद्राची मदत अपुरी आहे त्यामुळे आम्ही ती प्रति हेक्टरी 10 हजार दोन हेक्टरच्या मर्यादेत देणार आहे. अद्यापपर्यंत केंद्राचे पथक पूर, अतिवृष्टी पाहणीसाठी आलेले नाही. आम्ही दोन तीनदा विनंती केली. केंद्र सरकारचे पथक राज्यात येण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत मात्र अजुनही ते पथक आलेलं नाही असं सांगत त्यांनी केंद्रालाही टोला लगावला.