पुणे - 'आम्ही उद्धव ठाकरेंना उठा, शरद पवारांना शपा म्हणावे काय?', असा थेट सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी 'चंपा म्हणाले म्हणून काय झाले?' असा खोचक सवाल केला होता, त्याला चंद्रकांत पाटलांनी प्रत्युत्तर दिला.

पुण्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी पत्रकार परिषद घेतली होती, त्यावेळी ते बोलत होते. चंपा आणि टरबुज्या म्हणायचं हे जे कल्चर सुरू आहे ते बदलला पाहिजे. नाहीतर आम्हालाही जयंत पाटीलांना जपा, शरद पवारांना काय शपा, उद्धव ठाकरेंना उठा आणि पुढचे मी काय म्हणत नाही ते म्हणणे योग्य नाही, पुढे चहा पित असताना म्हणू, ही संस्कृती जोपासायची आहे काय, असा उपरोधिक टोलाही चंद्रकांत पाटलांनी ठाकरे सरकारला लगावला.

देवेंद्र फडणवीसांनी वाढीव वीजबिल भरले म्हणजे त्यांनी वीजबिल भरण्याचे समर्थन केले असे म्हणणे हास्यास्पद आहे. वीजबिलात सवलत देणार ही घोषणा नितीन राऊतांची आहे, त्यांनी ती पूर्ण करावी, असे सल्लाही चंद्रकात पाटलांनी ऊर्जामंत्र्यांना दिलाय.

ठाकरे सरकार आम्ही पाडू, असे आम्ही कधीच म्हणालो नाही. पण हे सरकार त्यांच्यातील विसंवादामुळे पडेल, असे आम्ही म्हणालो होतो. आता ते वर्षभरात पडले नाही, पण पुढे पडेल की नाही हे माहीत नाही. परंतु दरवेळी हे सरकार पडणार नाही, पडणार नाही, असे का म्हणावे लागते आहे. तुम्ही बिनधास्त काम करा ना, हे सरकार तुम्ही चालवा, जे तुम्ही चालवू शकत नाहीये, असा निशाणाही त्यांनी ठाकरे सरकारवर साधलाय.